योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते – मानव कांबळे यांचे प्रतिपादन

0
293

नंदकुमार सातुर्डेकर यांचा हिंदरत्न कामगार पुरस्काराने गौरव

पिंपरी,दि. ४ (पीसीबी) – योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते. गेले ३५ वर्षाहून अधिक काळ पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेल्या तत्त्वनिष्ठ आणि निर्भीड विचाराच्या नंदकुमार सातुर्डेकर यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार’ दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनी येथे केले.

इंटक संलग्न हिंद कामगार संघटनेच्या वतीने सन २०२३ चा ‘हिंदरत्न कामगार पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातुर्डेकर यांना ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, संत तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणे व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खराळवाडी येथील हिंद भवन येथे आयोजित या कार्यक्रमात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती वैष्णवी विनोद जगताप हीचाही सन्मान करण्यात आला. तसेच दिव्यांगांना तीन चाकी सायकल चे वाटप करण्यात आले. यावेळी हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस यशवंत सुपेकर, उपाध्यक्ष शांताराम कदम, खजिनदार सचिन कदम, सचिव गणेश गोरीवले, प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कामगार नेते अनिल रोहम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, प्रसाद शेट्टी, इंटक सचिव मुकेश तिगोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, शहर काँग्रेस महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, विरेन्द्र गायकवाड, नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, कोकण खेड युवाशक्ती अध्यक्ष रुपेश मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम आदी मान्यवर उपस्थित होते .

कांबळे म्हणाले की, कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या सातुर्डेकर यांनी कोणत्याही प्रलोभनांना आमिषाला बळी न पडता या शहरात पत्रकारिता केली. त्यामुळे त्यांचा गौरव अतिशय उचित आहे. पिंपरी महापालिका दिव्यांगांसाठी बऱ्यापैकी काम करत आहे मात्र राज्य शासन उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, महागाई बेकारी यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. कामगार कायद्यातील बदलांमुळे कामगार अडचणीत आला आहे. सामान्यांना न्याय देणाऱ्या सरकारची गरज आहे.
सत्काराला उत्तर देताना नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, गेल्या काही वर्षात पत्रकारिता क्षेत्र झपाट्याने बदलले आहे. याही परिस्थितीत टिकून राहणे पत्रकारांसाठी मोठे आव्हान आहे. जागतिकीकरण, कंत्राटीकरण, कामगार कायद्यातील बदल याचा कामगार चळवळीवरही मोठा परिणाम झाला आहे. गिरणी कामगारांचा लढा अयशस्वी झाल्यानंतर फारसा संघर्ष न करता मिळेल ते पदरात पाडून घेण्याची कामगारांची मानसिकता झाली आहे. याही परिस्थितीत इंटकशी संलग्न हिंद कामगार संघटनेसारखी एक संघटना कामगारांसाठी लढा देत आपला सोळावा वर्धापन दिन साजरा करते. ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. हिंद रत्न कामगार पुरस्कारामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वनाथ जगताप यांनी सूत्रसंचालन केले.