समाजातील सर्व घटकांना संघटित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य निर्माण केले त्यांना मानवंदना देण्यासाठी आपणही एकत्र आलं पाहिजे – विनोद बंसल

0
540

पिंपरी, दि. ०४ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात ढोलताशांचे सामूहिक महावादन व मानवंदनेचा कार्यक्रम शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी भक्ती शक्ती समोशिल्प निगडी येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समिती व ढोल ताशा महासंघाच्या वतीने या सामूहिक महावादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन प्राधिकरण येथे उभारण्यात आलेल्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक व उद्योजक माननीय श्री विनोद सुरज महान बंसल हे उपस्थित होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा.श्री.शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष मा.श्री. पराग ठाकूर तसेच प्रकाश मिठभाकरे व शिवजयंती समन्वय समितीचे निमंत्रक संदीप जाधव व ढोल ताशा महासंघाचे प्रमुख विशाल मानकर हे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं मर्दानी दैवत आहे या महापुरुषाला मानवंदना ही तशाच रणवाद्यांच्या सहाय्याने देण्यात येत आहे ही पिंपरी चिंचवडकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे. सर्व समाज संघटित करण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचा आदर्श घेऊन अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समिती व ढोल ताशा महासंघ पिंपरी चिंचवड यांनी शहरातील सर्व ढोल पथकांना व शिवजयंती आयोजकांना एकत्र आणून 1000 ढोल 350 ध्वज व 350 ताशे यांच्या सामूहिक महावादनाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून समाजाने या उपक्रमात सहभागी व्हावे. असे मत उद्घाटक श्री विनोद बंसल यांनी व्यक्त केले.

श्री पराग ठाकूर यांनी सदर उपक्रमाची दखल फक्त पिंपरी चिंचवड, पुणे व महाराष्ट्रातच घेतली जात नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबईमधील त्रिविक्रम ढोल पथकापर्यंत हा विषय पोहोचला आहे व त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्याचे सांगितले. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ एक गाव एक शिवजयंती साजरा करणाऱ्या गावांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व रोजगार देण्याचे शंकर जगताप यांनी जाहीर केले. अतुल दौंडकर यांनी ढोल ताशा पथकातील कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत व तयारी बाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत जाधव यांनी केले सूत्रसंचालन सचिन ढोबळे यांनी केले कुणाल साठे यांनी आभार व्यक्त केले व सामूहिक शिववंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.