कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ “उदय कोटक” यांनी दिला राजीनामा…! आता कोण सांभाळणार जबाबदारी ?

0
284

देश,दि.०२(पीसीबी) – देशातील सुप्रसिद्ध खाजगी बँक कोटक महिंद्राचे सीईओ आणि एमडी उदय कोटक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2023 पर्यंत होता परंतु त्यांनी तात्काळ राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

संचालक मंडळाच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही माहिती दिली. हे पत्र त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरही शेअर केले आहे. उदय कोटक म्हणाले की, याविषयी बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो आणि हे पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. राजीनामा दिल्यानंतर उदय कोटक यांनी ट्विटरवर एक मोठी पोस्ट लिहीली आहे.

त्यात त्यांनी लिहिले की, ”माझ्या उत्तराधिकारीची निवड माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण बँकेचे अध्यक्ष, मी आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालकांनी या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या पदांचा राजीनामा देणे आवश्यक आहे. मी बँकेच्या सीईओ पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. सध्या सहव्यवस्थापकीय संचालक असलेले दीपक गुप्ता उत्तराधिकारीबाबत रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळेपर्यंत या सीईओची जबाबदारी सांभाळतील.”

दरम्यान पुढे ते म्हणाले की, ”संस्थापक असल्याने मला बँक आणि या ब्रँडशी घट्टनाते आहे. मी या संस्थेची बिगर कार्यकारी संचालक म्हणून सेवा करत राहीन. व्यवस्थापन टीम विलक्षण आहे. हा वारसा ते पुढे नेतील. संस्थापक येतात आणि जातात, परंतु संस्थेची सतत भरभराट होत असते.”

”काही वर्षांपूर्वी मी जेपी मॉर्गन आणि गोल्डमॅन सॅक्स सारख्या नावांचे जागतिक वित्तीय बाजारावर वर्चस्व असल्याचे पाहिले. भारतातही अशीच संस्था निर्माण करण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न घेऊन कोटक महिंद्रा बँकेची स्थापना 38 वर्षांपूर्वी झाली. या बँकेचे कामकाज 3 कर्मचारी आणि 300 चौरस फुटांच्या कार्यालयातून सुरू झाले होते” असे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले.