मराठा आरक्षण मोर्चावर लाठीचार्ज, जाळपोळ

0
337

जालना, दि. १ (पीसीबी) – जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात राडा झाला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर तुफान लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे. मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केल्याने त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केल्याने दोन बसगाड्यांची राखरांगोळी झाली.
आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. या लाठीचार्जनंतर बीड बंदची हाक देण्यात आल्याचे वृत्त समोर आहे. मात्र अद्याप बंद बाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्र्यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवालीअशोक चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हीडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो., असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

खुद्द शरद पवार यांनी याबाबत माध्यांना प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, मला जालन्याहून एक दोन लोकांचे फोन आले. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला, शांततेने सगळं चाललं होतं. मात्र चर्चेनंतर पोलिस बळाचा वापर करुन आंदोलकांना तिथून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. तेथील तरुणांवर प्रखर लाठीहल्ला केला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची गरज नव्हती. हल्ली विशेषतः सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर बळाचा वापर होतो आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांची अशी सूचना असावी. त्यांच्या मनामधील काही घटकाबद्दलच्या भावना पोलिसांच्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. आज तेच चित्र जालन्यात झालेलं आहे.