इंडिया पुढे सरकत असतानाच केजरीवाल यांचा खोडा

0
375

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – बलाढ्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील सत्ताकेंद्र खेचण्यासाठी विरोधी नेत्यांनी ‘एकी’ दाखवून,‘इंडिया’च्या बॅनर खाली एकत्र आले आहेत. मुंबईत दोन दिवस बैठकांचा सपाटा लावून विरोधी नेते मोदी-शाहांविरोधात लढण्याचा ‘रोड मॅप’ ठरवणार आहेत. मात्र, कसेबसे तरी जुने हेवेदावे बाजुला करून ‘इंडिया’च्या घटक पक्षांतील नेते बैठकीपुरते तरी एकत्र येत असतानाच ‘आप’ने पंतप्रधानपदाची अपेक्षा मांडून, बैठकीआधीच खळबळ उडवून दिली आहे.

आम आदमी पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीत आगामी रणनीती ठरणार आहे. यामध्ये लोकसभेच्या जागांसदर्भात देखील चर्चा होणार आहे. पण त्या आधीच ‘आप’च्या मागणीमुळे इंडिया आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.

याआधी काँग्रेसने देखील राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यातच आता ‘आप’च्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी केली. त्यामुळे ‘इंडिया’च्या या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, ‘आप’च्या या मागणीवर आघाडीतील बाकीचे पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘इंडिया’च्या या बैठकीत आघाडीतील घटक पक्षात जागा वाटपसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच संयोजक ठरविण्याची शक्यता असतानाच आता या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार राहुल गांधी की अरविंद केजरीवाल या वरून दोन्ही पक्षात वाद रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘इंडिया’ची मुंबईतील बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.