आताच मोक्यातून सुटून आलोय, आता मी भाई आहे सराईत गुन्हेगार आणि टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

0
7167

देहूरोड – दि. २९ (पीसीबी) – हॉटेल मध्ये मित्रांसोबत जेवण करण्यासाठी आलेल्या एकाला पाच जणांनी बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. त्यातील एकाने ‘मी आताच मोक्यातून सुटून आलोय. आता मी भाई आहे’ असे म्हणत दमदाटी केली. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री दहा वाजता सवाना चौक, देहूरोड येथे घडली.

सुरज पवार (वय 32), दत्ता कटारे (वय 28), साहिल राऊत (वय 25), राज पाटील (वय 25), केतन चव्हाण (वय 26) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनोद दत्तात्रय जगताप (वय 37, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र सवाना चौकात हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी सुरज पवार आणि त्याचे साथीदार आले. सुरज याने फिर्यादी यांना ‘मी आता भाई आहे. मी आताच मोक्यामधून सुटून आलो आहे. तू रफिक याला कसा भाई म्हणतो’ अशी धमकी दिली. त्यांनतर सुरज पवार याने फिर्यादीस शिवीगाळ करून ‘रफिकला भाई म्हणतो. तुला आता संपवून टाकतो’ असे म्हणत टेबलवरील बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. अन्य आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने टेबलवरील बाटल्या उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारल्या. फिर्यादी खाली पडल्यावर त्यांना शिवीगाळ करत आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.