संतापजनक…! साताऱ्यात महिलेला चौघांकडून भर चौकात मारहाण, व्हिडिओ व्हायरल…

0
651

सातारा,दि.२९(पीसीबी) – साताऱ्यात भररस्त्यात एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जनावरांसाठी कडवळ चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करून महिलेला उसाचे दांडके व लाकडी काठीने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पानवण येथील चौघांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांनी महिलेवर धारदार शस्त्राने वार देखील केले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

देवदास रोहिदास नरऴे (वय ३०), पिंटु उर्फ शांताराम रोहिदास नरळे (वय ३५), संतोष गोपाळ नरळे ( वय ३६), जनाप्पा विठ्ठल शिंदे ( वय ६०, सर्व रा. पाणवन (ता. माण ) अशी या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा नावे आहेत. यापैकी देवदास नरळे व पिंटु उर्फ शांताराम नरळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

देवदास महादेव तुपे (वय १७, रा. पाणवन, ता. माण) याने म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शनिवार सकाळी ९च्या सुमारास पाणवन ( ता. माण ) गावच्या हद्दीत महालक्ष्मी खताच्या दुकानासमोर माझी आई शाहिदा हिने गुरांसाठी कडवळ घेण्यासाठी अगोदर दिलेले पैसे देवदास रोहिदास नरऴे यास परत मागितले असता त्याचा राग मनात धरुन देवदास नरऴे, पिंटु उर्फ शाताराम नरळे, संतोष नरळे व जनाप्पा शिंदे यांनी आपसात संगनमत करून आमची जात मातंग असल्याचे माहित असूनही त्यांनी माझी आई शाहिदा हीस पिंटु उर्फ शाताराम नरळे याने उसाने, जनाप्पा विठ्ठल शिंदे यांने काठीने मारहाण केली. तसेच देवदास नरऴे व संतोष नरऴे याने माझे आईचे डोक्याचे केस धरुन फरपटत रस्त्यावर आणून तिच्या अंगाशी झोंबाझोंब केली. मलाही चौघांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून तिचे मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून “या मांगाट्यांना लय मस्ती आलीय, त्यांना गावातून हकलून बाहेर काढू” असे म्हणून धमकी दिली.’ या घटनेविरोधात रात्री म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान या गुन्ह्याच्या घटनेनंतर पाणवन इथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दहिवडी व वडूज विभागाचे उपविगीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत. मान-खटाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने चाऱ्याचा प्रश्न बिकट सुरू आहे. येथील लोकांनी जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत आहे. अशी स्थिती असतानाच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.