पवारसाहेबांनी तुम्हाला खूप संधी दिल्या, त्याची परतफेड अशी कृतघ्न होऊन करू नका…

0
328

पुणे ,दि.२८(पीसीबी) – बीड येथील कालच्या (ता.२७) सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नाव न घेता पवारांवर टीका करीत त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्याला त्यांच्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी लगेचच जोरदार उत्तर आज दिले.

त्यातही भुजबळ यांनी पवारांवर जळजळीत टीका केली होती. त्याचा समाचार लगेच पवारांचे कट्टर समर्थक आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला.”ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत,” अशी जळजळीत टीका त्यांनी भुजबळांवर ट्विटरच्या माध्यमातून केली. तर, प्रदेश युवकचे कार्याध्यक्षही असलेल्या वरपेंनी पत्रकच काढून कालच्या सभेवर हल्लाबोल केला. त्यांचा रोख हा मुंडेवर अधिक राहिला.

मुंडेंच्या कालच्या भाषणात आदरणीय पवारसाहेबांविषयी असलेला आकस,गरळ,राग स्पष्ट दिसत होता. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पहाटेचा फसलेला शपथविधी आहे. कारण तो केवळ पवारसाहेबांमुळे फसला होता, असे वरपे म्हणाले. सामाजिक न्याय खातं मिळाल्यामुळे मुंडेंच्या मनात खदखद आणि राग होता, तो असा बाहेर आला,असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीत मुंडेंना प्रवेश दिल्यानंतर त्यांना पवारसाहेबांनी विधान परिषदेत आमदार,विरोधी पक्षनेते ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्यायसारखं महत्त्वाच्या खात्याचे मंत्री केलं. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीही ते होते. एवढी सर्व पदे त्यांना बीड जिल्ह्याच्या विकासाकरिता पवारसाहेबांनी दिली होती. यानंतरही कालच्या सभेत पवारसाहेबांनी बीड जिल्ह्यासाठी काय केलं, असे बालिश आणि बेछूट आरोप मुंडेंनी केल्याबद्दल वरपेंनी संताप व्यक्त केला. तुमचा एकंदरीत राजकीय इतिहास पाहता पवारसाहेबांनी तुम्हाला खूप संधी दिल्या. हे त्यांचे तुमच्यावर असलेले उपकार आहेत. त्याची परतफेड अशी कृतघ्न होऊन केली जाते, हे महाराष्ट्राला पहिल्यांदा पाहायला मिळालं,असा टोला त्यांनी लगावला.