“चंद्राला हिंदूराष्ट्र तर शिवशक्ती पॉइंटला राजधानी घोषित करा…”

0
331

देश दि. २८ (पीसीबी) – गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोच्या चंद्रयान 3 चे यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. त्यामुळे संपुर्ण देशात इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या यशस्वी झालेल्या मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरी करण्यात यावा अशी घोषणा केली आहे. तर ज्या ठिकाणी चंद्रयान 3 उतरले त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ पॉइंट नाव देण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी शिवशक्ती पॉइंटविषयी एक मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी, चंद्राला हिंदु सनातन राष्ट्र करण्याची आणि “शिवशक्ती पॉइंट” राजधानी बनवण्याची मागणी केली आहे.

चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून तीन मोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. त्यातीलच एक घोषणा म्हणजेच, चंद्रयान तीन ज्या ठिकाणी उतरले त्या जागेला शिवशक्ती’ पॉइंट नाव देणे. मात्र त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर चक्रपाणी महाराज यांनी अजबच मागणी केली आहे. या मागणीचा त्यांनी 1 मिनिट 45 सेकंदाचा स्टेटमेंट व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये ते म्हणाले आहेत की,
“चंद्राला आता संसदेकडून हिंदू सनातन राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे, तर चंद्रयान-3 चे लँडिंग ठिकाण “शिवशक्ती पॉइंट” राजधानी म्हणून विकसित करावे” या मागणीनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

चक्रपाणी महाराज यांच्या म्हणण्यानुसार आपण तसे केले तर, “जिहादी मानसिकतेचा कोणताही दहशतवादी तेथे पोहोचू शकणार नाही”. त्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे. तर पुढे बोलताना, चंद्रयान 3 लँडिंग पॉईंटला नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती पॉइंट नाव दिल्यामुळे यासाठी त्यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर, “इतर कोणत्याही व्यक्तीने आणि देशातील जनतेने गझवा-ए-हिंद तेथे सोडू नये, म्हणून संसदेने ठराव मंजूर करून चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे आणि तेथे ‘शिवशक्ती पॉइंट’ राजधानी बनवावी” अशी देखील सोबत मागणी केली आहे.

दरम्यान, चक्रपाणी महाराज यांनी केलेल्या मागणीची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून काही नेत्यांची याबाबत मस्करी देखील उडवली आहे. इस्त्रोची कामगिरी यशस्वी झाल्यामुळे तसेच चांद्रयान 3 सॉफ्ट लँडिंग झाल्यामुळे भारताने यशाचे आणखीन एक शिखर गाठले आहे. अशातच चक्रपाणी महाराजांनी केलेल्या वक्तव्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.