नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत वैशाली भांडारकर प्रथम

0
311

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित तिसाव्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यस्पर्धेत वैशाली भांडारकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, रावेत प्राधिकरण पेठ क्रमांक २९ येथे रविवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झालेल्या या काव्यस्पर्धेत एकूण १३० कवींनी लेखी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी अकरा ते ऐक्याऐंशी वयोगटातील सुमारे ७० कवींनी प्रत्यक्ष काव्य सादरीकरण केले. ज्येष्ठ कामगार साहित्यिक अरुण बोऱ्हाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तीर्थस्वरूप नागरिक संघाचे सचिव बाळासाहेब कुंभार, अध्यक्ष अरविंद देशमुख, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, संचालक संपतराव शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच सविता इंगळे, शोभा जोशी, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, प्रा. दिनेश भोसले, अशोक गोरे, सुभाष चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. काव्यस्पर्धेत वैशाली भांडारकर (‘आली जरी साठी’) – प्रथम क्रमांक, प्रकाश गायकवाड (‘शेतकऱ्याची व्यथा’) – द्वितीय क्रमांक, गणेश भुते (‘पाऊस’) – तृतीय क्रमांक, राजश्री वाघमारे (‘श्रावणमास’) – चतुर्थ क्रमांक आणि संजय जाधव (‘जगून घे थोडं’) – उत्तेजनार्थ यांनी पारितोषिके पटकावली. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय सहभागी प्रत्येक कवीला प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अरविंद वाडकर आणि सुलभा सत्तुरवार यांनी परीक्षण केले.

सभागृहाबाहेर अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावणधारा आणि सभागृहात सुमारे साडेचार तास गीत, गझल, कवन, विडंबन, मुक्तच्छंद अशा विविध प्रकारच्या आणि वेगवेगळ्या आशयांच्या काव्यवर्षावाने श्रोत्यांना चिंब भिजवले. अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतातून, “साहित्य माणसाला जगायला अन् दु:खातून तरायला शिकवते!” अशी भावना व्यक्त करीत ज्ञानेश्वरमाउली, तुकोबा ही संत मांदियाळी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे प्रगल्भ साहित्यिक नेतृत्व आपल्या राज्याला लाभले, हे परम भाग्य आहे, अशी कृतज्ञता व्यक्त केली. राज अहेरराव यांनी प्रास्ताविकातून, “प्रत्येक कवी हा संतांचा वारसदार आहे, अशा भावनेने नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ सलग तीस वर्षांपासून श्रावणी काव्यस्पर्धेचे यशस्वी आयोजन करीत आहे!” अशी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या संयोजनात माधुरी ओक, प्रा. पी. बी. शिंदे, अश्विनी कुलकर्णी, अनिकेत गुहे, चिंतामणी कुलकर्णी, अशोक कोठारी, शरद काणेकर, रजनी अहेरराव, प्रदीप गांधलीकर यांनी परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी विधाटे यांनी आभार मानले.