पिंपरी चिंचवड शहराचे नावलौकिक असणाऱ्या “अप्पुघरला” जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्याची मागणी

0
646

भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराची सध्या स्मार्ट सिटी म्हणुन ओळख निर्माण होत असताना शहराचे नावलौकिक असणाऱ्या अप्पूघरसारख्या पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, हजारो नागरिक सकाळी दुर्गा टेकडी येथे व्यायाम व योगासने करण्यासाठी येत असतात पण अप्पूघरकडे सुधारित व हायटेक खेळण्यांच्या अभावामुळे नागरिक पाठ फिरवताना दिसत आहे त्यामुळे याची दखल घेत जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी किशोर हातागळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आज केली आहे.

हातागळे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, “पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण भागात सुमारे सन १९८९ साली अप्पुघरची व त्याअगोदर दुर्गा टेकडी या निसर्गाचा ठेवा असणाऱ्या वृक्षपर्यटन केंद्राची निर्मिती झाली, २० ते २५ वर्षापुर्वी अप्पूघरचा जर विचार केला तर उन्हाळ्याच्या सुट्टीत अप्पूघरला राज्यातील नागरिकांच्या कौटुंबिक सहली व अनेक शाळांच्या सहली याठिकाणी असणाऱ्या खेळण्याचा, मनोरंजनात्मक गोष्टींचा व निसर्गाचा भरभरून आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत होत्या. पुणे जिल्ह्यात अप्पूघरसारखे दुसरे असे पर्यटनस्थळ अस्तित्वातच नव्हते, एवढया मोठ्या क्षेत्रफळाचे व मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन जोपासनारी दुर्गा टेकडी आजही विकासाच्या त्यामानाने दुर्लक्षित आहे.

पुणे जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातुन नागरिकांची अप्पूघर व दुर्गा टेकडी याठिकाणी रीघ लागायची, लहानथोरांसाठी सगळ्या वयाच्या लोकांना आपापल्या आवडीनुसार मनोरंजनात्मक करामती इथं दाखवल्या जायच्या. धडकगाडीपासून फिरत्या कपबशीपर्यंत ते किंकाळत्या डायनासॉरपासून अंगावर धावून येणाऱ्या ऍनाकोंडापर्यंत सगळ्या गोष्टी इथं होत्या. भुतबंगला, क्वाईन टाकल्यावर जोरात हसणारा विदुषक (बाहुली) सर्वांना खळखळून हसवायला लावायची, पुण्यात पहिल्यांदा 3D पिच्चर बघायचं ठिकाण म्हणजे अप्पूघर.

पिंपरी चिंचवड शहर आज स्मार्टसिटीकडे वाटचाल करत असताना मात्र शहराचे नावलौकिक व भुषण असणारे असे महापालिकेचे प्रकल्प आज मोडकळीस आलेले आहेत, येथील जुनाट झालेले व बंद पडलेले खेळणे येथील मनोरंजनात्मक असणाऱ्या विविध गोष्टी पडद्याआड पडल्यामुळे अप्पूघरला आज स्थानिक नागरिकही पाठ फिरवताना दिसतात, याची आपण गांभीर्याने दखल घेत अप्पूघरला “जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ” बनवण्यासाठी विशेष प्रशासकीय बैठक घेऊन याचा आराखडा तातडीने बनवण्याची व त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करण्याची विनंती व मागणी आम्ही आपणाकडे करत आहोत, तरी आपण शहराच्या विकासासाठी मा.पर्यटनमंत्री व पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त यांना तसे स्पष्ट आदेश द्यावेत असे त्यात नमुद केले आहे.