एअर इंडियात सेटिंग असल्याचे सांगून तिकिटाच्या बहाण्याने पावणे तीन लाखांची फसवणूक

0
290

ताथवडे, दि. २५ (पीसीबी) – एअर इंडिया कंपनीमध्ये आपली सेटिंग असून आपल्याकडे एअर इंडियाच्या तिकिटाचा कोटा आहे. असे सांगत कॅनडाचे तिकीट देण्याच्या बहाण्याने एका आयटी अभियंत्याची दोन लाख 70 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 16 जुलै ते 24 ऑगस्ट या कालावधीत ताथवडे येथे घडली.

फिरोज अस्लम आलम (वय 34, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लविश जैन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा एक मित्र कॅनडा येथे राहतो. त्याच्या पत्नीची डिलिव्हरी असल्याने त्याच्या आईला हिमाचल प्रदेश मधून कॅनडा येथे जाण्यासाठी विमान तिकीट काढून देण्याबाबत मित्राने फिर्यादी यांना सांगितले. मित्राने दिलेल्या एका एजंटच्या नंबरवर फिर्यादी यांनी फोन केला असता त्याने सांगितले की, त्याची एअर इंडिया कंपनीमध्ये सेटिंग आहे. त्याच्याजवळ तिकिटाचा काही कोटा असतो. त्यावर त्याला 40 टक्के डिस्काउंट मिळतो.

त्यामुळे फिर्यादी यांनी कॅनडाच्या तिकिटासाठी एक लाख 30 हजार रुपये आरोपीला पाठवले. त्याने तिकीट बुक झाले असून ते प्रवासाच्या दोन दिवस अगोदर मिळेल असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याबाबत जास्त विचार केला नाही. मात्र आरोपीने पुन्हा फिर्यादी यांना फोन करून तिकीट बुक केलेली फ्लाईट रद्द झाली आहे. त्यामुळे ते तिकीट रद्द करावे लागेल त्याचे पैसे दोन दिवसात पाठवतो असे म्हणून दुसऱ्या फ्लाईटचे तिकीट काढण्यासाठी एक लाख 40 हजार रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी एक लाख 40 हजार रुपये आरोपीला पाठवले. त्यानंतर त्याने 22 ऑगस्ट रोजी फ्लाईट असल्याचे सांगितले.

त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला वारंवार फोन केला मात्र आरोपीने फोनवर बोलणे टाळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.