पवार हे आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षामध्ये फूट पडत नाही

0
260

इंदापूर, दि. २५ (पीसीबी) – शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत, वेगळा निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षामध्ये फूट पडत नाही, असे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख तशी आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा राजकारणातील मोठा नेता म्हणून अशी ओळख आहे. पवार कधी काय बोलतील हे मात्र सांगता येत नाही, पवार यांचे बोलणे होते, नंतर संभ्रमावस्था निर्माण होते. त्याचाच प्रत्यय आज आला. अन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

आज शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष व उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना चिंतेत पडल्याचे दिसते. शरद पवार कधी काय बोलतील याचा कुणाला सुद्धा अंदाज येत नाही. राजकीय विश्लेषक किंवा प्रसारमाध्यमे सुद्धा बुचकळ्यात पडतात. आज शरद पवार यांनी एका ठिकाणी अजित पवार हे आमचेच नेते आहेत असे वक्तव्य केल्याने पवारांचा बोलण्याचा हेतू काय हे स्पष्ट होऊ शकले नाही.

इंडिया आघाडीची मोट बांधण्यासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. परंतु शरद पवार यांची दररोजची मीडियासमोर बोलताना वेगवेगळी वक्तव्य येत असल्याने अनेक तर्क वितर्क होत आहेत. तसेच शरद पवारांनी सांगितले की लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. दरम्यान बुद्धिबळामध्ये जशा खेळी असतात. त्याचप्रमाणे शरद पवार यांना आगामी पुढील दहा खेळी माहित असतील किंवा माहित पडतात असे राजकीय जाणकार विश्लेषण करतात.

आज मात्र शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये सुद्धा धाकधूक वाढली आहे . पवार नेमके कुठे आहेत, पवार यांच्या वक्तव्याचा नेमका हेतू काय? याविषयी विविध चर्चा सुरू आहे.

शरद पवारांचे राजकारण भल्याभल्यांना अद्याप पर्यंत समजले नाही. ते कधी कुठली गुगली टाकतील हे अद्याप पर्यंत राजकीय जाणकारांना सुद्धा समजले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा कार्यक्रमात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर थाप मारली होती. त्याचवेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या.