पुतिन विरुद्ध बंड करणाऱ्या प्रिगोझिनचा विमान अपघात, वॅगनर प्रमुखासह 11 ठार

0
371

मॉस्को, दि. २५ (पीसीबी) – रशियाच्या वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगिनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रिगोझिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. या विमान अपघातात १० जणांचा मृत्यू झालाय ज्यात वॅग्नर ग्रुपचे येवगिनी प्रिगोझिन यांचाही समावेश आहे.

जूनमध्ये रशियन सैन्याविरोधात विद्रोह करणाऱ्यांचे नेतृत्व येवगिनी प्रिगोझिन करत होते. जे प्लेन क्रॅश झाले त्यातील प्रवाशांच्या यादीत प्रिगोझिन यांचेही नाव आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान प्रिगोझिन यांचेच होते. या विमानात ३ पायलटसह एकूण ७ प्रवासी होते. सध्या विमान अपघाताची कारणे शोधली जात आहेत. मॉस्कोच्या उत्तरी भागात हे विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येते. बुधवारी दुपारी ही घटना घडली.

‘वॅग्नर ग्रुप’ला पुतीन यांची खासगी सेना संबोधले जात असे. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर रशियात झालेल्या खासगीकरणाचा लाभ घेत अमाप माया गोळा केलेल्या मंडळींचे येवगिनी प्रिगोझिन हे शिरोमणी होते. पुतीन यांच्या उदयानंतर तर त्यांचे भाग्य फळफळले. प्रिगोझिन यांनीही पुतीन यांना गरज भासेल तेव्हा कसलाही विधिनिषेध न बाळगता मदत केली. आज रशिया ज्या युक्रेनसोबत युद्ध लढत आहे, त्या युक्रेनचा क्रीमिया हा प्रांत रशियाने २०१४ मध्येच घशात घातला होता. तेव्हा ‘वॅग्नर ग्रुप’ने रशियन सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला होता.

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या गुप्तचर अहवालानुसार वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांची संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. १८०० किलोमीटर सीमेवर चाललेल्या युक्रेन युद्धात वॅग्नर गटाने रशियाला खूपच भरभक्कम साथ दिली परंतु येवगिनी अचानक बंडखोर झाले. त्यांनी आपल्या सैनिकांच्या मृत्यूसाठी रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि लष्करप्रमुख जनरल वेलरी गेरासीमोव यांना धडा शिकवण्याची घोषणा केली होती.