रिक्षा चालक कार्यकर्त्याच्या मुलाचा हट्ट राज ठाकरे यांनी केला पूर्ण

0
440

दापोडी, दि. २३ (पीसीबी) – मस्कुलर डिसट्रॉपी’ या आजाराने त्रस्त असलेल्या रिक्षा चालक कार्यकर्त्याचा ‘राज’ या नावाच्या मुलाचा हट्ट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूर्ण केला. कार्यकर्त्याच्या दापोडी येथील घरी जात ठाकरे यांनी मुलाची भेट घेतली. स्वत: खरेदी करुन त्याच्यासाठी खेळणी, खाऊ आणला. ठाकरे यांनी मुलाचा भेटीचा हट्ट पूर्ण केल्याने देशपांडे कुटुंबीयांना आनंद झाला.

दापोडीत वास्तव्यास असलेले विशाल देशपांडे हे मनसेचे कार्यकर्ते आहे. मनसेच्या स्थापनेच्या अगोदरपासून ते राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. कंपनीतील नोकरीनंतर ते आता रिक्षा चालवतात. देशपांडे यांना राज नावाचा मुलगा आहे. तीन महिन्यांपूर्वी या मुलाला मस्कूलर डिसट्रॉपी या आजाराचे निदान झाले. मुलाची राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्याने वडिलांकडे तसा हट्ट धरला.

मनसेच्या पदाधिका-यांनी विशाल देशपांडे यांच्या मुलाच्या आजाराची आणि त्याची भेटण्याची इच्छा राज ठाकरे यांनी सांगितली. सोमवारी ठाकरे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर अवघ्या तिस-या दिवशी म्हणजे आज ठाकरे हे विशाल यांच्या घरी आले. मुलासाठी स्वत: खरेदी करुन खेळणी आणली. त्याच्यासाठी खाऊ आणला. त्याच्यासोबत १५ ते २० मिनिटे गप्पा मारल्या. मुलाने पांढरा झब्बा घातला होता. त्यावर राज ठाकरे यांनी प्रिय राज असे लिहित स्वाक्षरी केली. ठाकरे यांनी घरी भेट देत इच्छा पूर्ण केल्याने देशपांडे कुटुंबीयांना आनंद झाला. ‘राज ठाकरे आमचा विठ्ठल आहे. मी माझ्या मुलाचेही नावही राज ठेवले आहे. मुलाने राज साहेबांना भेटण्याचा हट्ट धरला होता. याबाबत साहेबांना माहिती मिळताच त्यांनी घरी येत मुलाचा हट्ट पूर्ण केला. विठ्ठलाचे पाय माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांच्या घराला पाय लागले. विठ्ठलच आम्हाला भेटायाला आल्याने मनस्वी आनंद झाला’ अशी प्रतिक्रिया विशाल देशपांडे यांनी दिली.