पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून चर्चासत्राचे आयोजन
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल विशेष सत्कार
पिंपरी,दि. २०(पीसीबी) – पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षाचा मागोवा व वाटचाल, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी (दि.२१ ऑगस्ट) सकाळी ९:३० वाजता आकुर्डी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर सभागृह येथे होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, मावळचे आमदार सुनील शेळके, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमआरडीएचे महानियोजनकार विवेक खरवडकर, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. आयुक्तालय सुरु होऊन १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाच वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षांचा मागोवा आणि वाटचाल या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यामध्ये पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्यासह पीएमआरडीए, परिवहन विभागातील अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना नुकतेच वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला याबाबतची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. शहरातील विविध संघटना, राजकीय पक्ष आणि पिंपरी चिंचवड मधील सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आणि इतर पदाधिकारी व सभासदांनी केले आहे.