मुंबई,दि.२०(पीसीबी) – शिवसेना नेते रामदास कदम यांना हटवण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल ३०० शिवसैनिक दाखल झाले होते. त्यांनी कदम पिता-पुत्रांबद्दल नाराजी व्यक्त केलीय. त्यांना बाजूला न केल्यास राजीनामा देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय.
मागच्याच आठवड्यात मुंबईतल्या कांदिवली, चारकोप आणि मालाड येथील शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी रामदास कदमांची तक्रार करत राजीनामे सुपूर्द केले होते. काल पुन्हा वर्षा निवासस्थानी अंधेरी पूर्व, जागेश्वरी पूर्व, गोरेगाव आणि दिंडोशी येथील ३०० पदाधिकाऱ्यांनी दाखल होत मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कदम पिता-पुत्रांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांना हटवण्याची मागणी केली. नसता राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. रामदास कदम हे शिवीगाळ करतात, पक्षातून हकालपट्टी करण्याची धमकी देतात, असे आरोप नाराज गटाने केले आहेत.
दरम्यान, पदाधिकाऱ्यांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन केलं आहे. नाराजांनी शांत राहावं, तक्रारीसंबंधी विचार केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं कळतंय. येत्या काळात रामदास कदम यांच्यावर पक्ष कारवाई करतो का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. येत्या काळात एक मोठा पक्षप्रवेश होत असल्याचं सूचक विधान सुषमा अंधारे यांनी बाहेर आल्यानंतर केलं होतं. तो पक्ष प्रवेश कोणाचा? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.