नाशिक,दि.२०(पीसीबी) – नाशिकमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेत पहिल्याच दिवशी गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकमधील म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेला तरुण कॉपीचा मास्टर माईंड निघाल्याचे समोर आले आहे.
आता नाशिक तलाठी भरती परिक्षेतील पेपर फुटी प्रकरणातील आरोपी गणेश गुसिंगे याच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. याच आरोपीने २०१९ मधील म्हाडा भरती आणि २०२१ च्या पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचाही पेपर फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्याच्यावर 2021 साली गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी फरार असलेल्या या आरोपीला दोन वर्षे कसे काय अटक केली नाही असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. या प्रकरणात त्याच्या आणखी दोन साथिदारांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
म्हाडाच्या ५६५ रिक्त पदांच्या भरतीसाठी डिसेंबर २०२१ मध्ये परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेच्या काही तास आधी गैरप्रकार घडकीस आल्याचे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर म्हाडाने टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली. मात्र यातही गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. मराठवाडय़ातील परीक्षा केंद्रावर दलालांमार्फत अनेक बोगस उमेदवारांना परीक्षेस बसविण्यात आल्याचे, परीक्षा केंद्रावर अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप म्हाडाने फेटाळल्यानंतर समितीने सर्व पुरावे दिले. त्यानंतर टीसीएसच्या चौकशी अहवालात म्हाडाच्या निवड यादीतील अव्वल आलेले ६० परीक्षार्थी दोषी आढळले. त्यानंतर म्हाडाने या ६० जणांची निवड रद्द करून खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. असे असताना आता या ६० जणांच्या यादीत समाविष्ट असलेल्या गणेश घुशिंगेला तलाठी परीक्षा गैरप्रकारात अटक झाली आहे.
गणेश हा म्हाडा भरती परीक्षेच्या निवड यादीत अव्वल आला होता. तर तो एका परीक्षार्थीसाठी डमी उमेदवार म्हणून बसला होता. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी गणेशची चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी जबाब नोंदवून, नोटीस देऊन त्याला सोडण्यात आल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिली. गणेशला परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतरावर संशयित म्हणून अटक करण्यात आली असून या वेळी त्याच्याकडे अनेक अत्याधुनिक यंत्रसामग्री आढळली होती. त्याला २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान आरोपी गणेश गुसिंगे हा शासनाच्या विविध भरती प्रक्रियेत गरजू उमेदवारांचा शोध घेवून त्यांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवायचा. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत असल्याचेही समोर आले आहे. सध्या गुसिंगेच्या दोघा साथीदारांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.