पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शासकीय रुग्णालयातही “सर्वांना मोफत उपचार सुरू करा”

0
350

खाजगी रुग्णालयातील रुग्णांची आर्थिक लुट थांबविण्यासाठी कडक पावले उचला –

भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी दि.१९(पीसीबी)- राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात यंदाच्या १५ ऑगस्टपासुन सर्व रुग्णांना सर्व उपचार मोफत देण्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली पण राज्यातील महापालिकांना तसे लेखी स्पष्ट आदेश न मिळाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने तसे स्पष्ट लेखी आदेश तातडीने देण्याची मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे नुकतीच केली आहे.

किशोर हातागळे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, यंदाच्या १५ ऑगस्टला (स्वातंत्र्यदिनी) आपण राज्यातील सर्वच शासकिय रुग्णालयातील रुग्णांना सर्व प्रकारचे मोफत उपचार देण्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांना खुप मोठा दिलासा आहे, परंतु पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला तसे स्पष्ट लेखी आदेश अद्याप प्राप्त न झाल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आहेत, राज्य शासनाचे मोफत उपचाराचे आदेश असताना महापालिकेच्या रुग्णालयात बिल देण्यावरून सध्या नागरिक व रुग्णालय प्रशासनात किरकोळ वाद सुरू आहेत. मोफत उपचाराच्या या निर्णयामुळे गोरगरीब जनतेला खुप फायदा होणार आहे, त्यामुळे आपण तातडीने राज्यातील सर्व पालिका- महापालिका व सर्व शासकीय आरोग्य यंत्रणेला तसे तातडीने लेखी आदेश देण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी व आदेश न पाळणाऱ्या शासकीय रुग्णालयावर कडक कारवाई करावी तसेच शासन मंजुरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नवीन जिजामाता रुग्णालय, कै.कुटे रुग्णालय आकुर्डी व भोसरी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना याठिकाणी सुरूच नाही तिलाही तातडीने मंजुरी द्यावी व नागरिकांचे होणारे हाल तात्काळ थांबवावे.

त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात सुरू असणारी लुट थांबविण्यासाठीही आपण विशेष लक्ष देऊन अशा “लुटारू” रुग्णालयावर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊनही हे रुग्णालये रुग्णांकडुनही भरमसाठ बिल उकळत आहेत, त्यावरही आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

तसेच लवकरात लवकर आपण पिंपरी चिंचवड शहरातील कै. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCMH) यांच्यासह महापालिकेच्या सर्वच रुग्णालयातील रुग्णांना मोफत व चांगल्या दर्जाचे उपचार देण्याचे लेखी स्पष्ट आदेश देऊन नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देण्याची व्यवस्था करावी असे त्यात नमूद केले आहे.