शरद पवार यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजितदादांची उत्तर सभा

0
241

बीड, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमध्ये प्रचंड मोठी सभा घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. बीडमधील कोणताही मोठा सोबत नसताना शरद पवार यांची प्रचंड सभा झाली. या सभेला लाखभर लोकं उपस्थित होते, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंडे यांचे धाबे दणाणले आहेत. पवार यांनी यावेळी चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे शरद पवार यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आणि पवारांच्या चौपट भव्य सभा घेण्यासाठी अजितदादा गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. अजितदादा गटाची ही उत्तर सभा असेल असंही सांगितलं जात आहे. तसं सुतोवाच धनंजय मुंडे समर्थक नेत्याने केलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अभूतपूर्व सभा पार पडल्यानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक बळीराम गवते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज झालेल्या सभेत शरद पवार यांनी विकासात्मक मांडणी केली नाही. शरद पवार यांची आजची सभा ही तालुकास्तरीय होती. अजित पवार यांनी वेळ दिल्यास आम्हीही 27 तारखेला उत्तर सभा घेणार आहोत. आजच्या सभेपेक्षा चार पटीने कार्यर्त्यांची गर्दी आमच्या सभेला होईल, असा दावा बळीराम गवते यांनी केला आहे.

बळीराम गवते यांनी बबन गित्ते यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही भाष्य केलं. परळी येथील बबन गित्ते यांचा प्रवेश आमच्यासाठी पर्याय नाही. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. परळीतील नव्हे संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनता मुंडे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे बबन गित्ते यांच्या प्रवेशाने धनंजय मुंडे यांना काहीही फरक पडणार नाही, असं बळीराम गवते यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शरद पवारांच्या सभेत परळी विधानसभेतून बबन गित्ते यांचा जाहीर प्रवेश झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते तसेच अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी गित्ते यांच्यावर टीका केली आहे. या सभेमध्ये अदखलपात्र नेत्यांचा प्रवेश झाला. शरद पवार यांनाही या अदखलपात्र नेत्यांना व्यासपीठावर घ्यावे लागले, त्यामुळे असं वाटत नाही की ती त्यांची देखील इच्छा आहे. जिल्ह्यातील काही कान भरणाऱ्या नेत्यांमुळेच शरद पवारांनी ही सभा घेतल्याचं धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गित्ते यांनी आपल्या राजकीय वाटचालीवर भाष्य केलं. मी 2014मध्ये गोपीनाथ मुंडे यांना पाठींबा दिला ते मंत्री झाले. मी 2014 मध्येच पंकजा मुंडे यांना पाठींबा दिला त्याही मंत्री झाल्या. त्यानंतर 2019 मध्ये मी धनंजय मुंडे यांना पाठींबा दिला ते देखील मंत्री झाले. मला एवढंच सांगायचं आहे की पायगुण असतो. 2024 ला राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा गित्ते यांनी केला.