४२ प्रवाश्यांसह बस थेट पुलावरून खाली कोसळली…! अनेकजण गंभीर जखमी

0
431

जालना,दि.०९(पीसीबी) – जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा मोठा अपघात झाला. आयशर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलावरून खाली कोसळली. थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

मात्र, बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची यवतमाळ आगाराची बस 42 प्रवाशांना घेऊन पुसद येथून मुंबईच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, बस जालना ते मंठा या महामार्गावर आली असता, केंधळी पुलाजवळ आयशरला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

काही कळण्याच्या आत बस थेट पूलावरून 15 फूट खाली कोसळली. अपघातावेळी या बसमध्ये वाहक आणि चालक यांच्यासह 42 प्रवासी होते. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढून उपचारसाठी मंठ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यातील आठ प्रवाशांना अस्वस्थ आणि मुका मार लागल्याने त्यांना उपचारसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप घोडके हे रुग्णालयात दाखल झाले.

त्यांनी 8 जखमी प्रवाशांची विचारपूस करून प्रकृती जाणून घेतली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक अडचणीत येत आहेत.