भिडेंच्या अटकेसाठी सर्व संघटनांचा गुरूवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयावर महामोर्चा

0
265

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – मनोहर कुलकर्णी (भिडे) याचेवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शहरातील अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या असून त्यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात १० ऑगस्ट रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे.

मनोहर कुलकर्णी (भिडे) याने केलेले बेताल वक्तव्ये: संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ होता,तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज असू शकत नाही, जण गण मन हे आपले राष्ट्रगीत असू शकत नाही,१५ आगस्ट ला काळा दिवस पाळून उपवास करावा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केलेला आहे,महात्मा गांधी यांच्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे,तसेच महात्मा फुले हा भडव्याच्या यादीतला आहे असे अनेक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी (भिडे) याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोर्चाची वेळ गुरुवार १० ऑगस्ट,२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजताची आहे. मोर्चाचे ठिकाण दळवी नगर चिंचवड येथून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय प्रेम लोक पार्क चिंचवड असे असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

सर्व पुरोगामी पक्ष,पुरोगामी संघटना,सामाजिक संघटनां,यांचे पदाधिकारी कार्यकर्ते,तसेच सामान्य नागरिक,महिला मंडळ, युवक कार्यकर्ते यांनी या मोर्चामध्ये सर्व समर्थक आणि सहकार्‍यांसह वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेने केले आहे.