संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळा, उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

0
653

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावे असे निर्देश मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. मुंबई हाय कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

महान पुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेक प्रकरणे आहेत. अशी अनेक प्रकरणे असताना फक्त संभाजी भिंडे यांच्याविरोधातच जनहित याचिका दाखल का? असा प्रश्न कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला आहे. जनहित याचिका केवळ एका व्यक्तीच्या विरोधात दाखल करता येत नाही, अशी टिप्पणी हाय कोर्टाकडून करण्यात आली आहे.
कोर्टाने म्हटलं की, महान पुरुषांच्या संदर्भात काही अवमानकारक किंवा बदनामीकारक वक्तव्य येत असतील तर त्याविरोधात जनहित याचिका होऊ शकते, पण एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जनहित याचिका होऊ शकत नाही, कारण ही जनहित याचिका आहे, असं कोर्टाने म्हटलंय.