भाजपचे टार्गेट पुणे जिल्हा, मोदींच्या पाठोपाठ अमित शाह यांचा दौरा

0
335

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या सहा ऑगस्टला म्हणजेच रविवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येत आहे. पंतप्रधान आणि त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, शिरूर या तीनही लोकसभा मतदारसंघासाठी भाजप विशेष आग्रही आहे. शिंदेंचे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी त्यासाठी भाजपला मदत करणार असून प्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार हेसुध्दा कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपकडून त्यासाठी चाचपणी सुरू आहे. मोदी आणि नंतर शाह यांच्या दौऱ्याला त्यामुळे महत्व आहे.

अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृह आणि सहकार खातं आहे. सहकार खात्याकडून लॉन्च करण्यात आलेल्या एका पोर्टलचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी भाजपकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी अर्धा तास राखून ठेवण्यात आला आहे. मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थांच्या पोर्टलचं उद्घाटन केल्यानंत अमित शाह राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठकीत चर्चा करणार आहेत. सहकारमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार महेश लांडगे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराचा दौरा केला होता. टिळक स्मारक समितीकडून देण्यात आलेला लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींनी पुण्यात स्वीकारला होता. त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या दोन नवीन मार्गांचं उद्घाटन केलं होतं. तसेच शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाचंही उद्घाटन पीएम मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मोदी यांनी आपल्या भाषणातून एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडला असे बोलले जाते. पीएम मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यालाच सुरूंग लावायचा भाजपचा डाव असून त्यासाठीच बड्या नेत्यांचे वारंवार दौरे सुरू आहेत.