सहायक आयुक्त सतीश माने पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी

0
473

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार नियुक्ती

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पोलिस आणि जनता यांच्यात समन्वय राखण्याकरिता सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश महासंचालक कार्यालयाकडून घटक प्रमुखांना देण्यात आले. त्यानुसार, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक आयुक्त सतीश माने यांची जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण हे जनसंपर्काचे काम पाहत होते.

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर आर.के. पद्मनाभन यांनी पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या काळात खंडणी दरोडा विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी जनसंपर्क अधिकारी पदाचे काम पहिले. त्यानंतर, आलेल्या संदीप बिष्णोई यांच्या काळातही सुधीर अस्पत यांनीच जबाबदारी सांभाळली.
दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे शहरात बदलून आले. त्यांनी सुरुवातीला तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्यावर जनसंपर्क पदाची जबाबदारी सोपवली. काही कालावधीनंतर वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून वर्णी लावण्यात आली. कृष्ण प्रकाश यांची अकाली बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी अंकुश शिंदे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. अंकुश शिंदे यांनी कल्याणकर यांची जागा रिकामी करीत वरिष्ठ निरीक्षक रावसाहेब जाधव यांच्यावर जनसंपर्काचे काम सोपवले.

काही महिन्यातच अंकुश शिंदे यांची नाशिक आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. त्याजागी मुंबईहून आलेल्या विनय कुमार चौबे यांनी शहराची सूत्रे हाती घेतली. त्यानंतरही रावसाहेब जाधव हेच काम पाहत होते. मात्र, जाधव हे अचानक वैद्यकीय रजेवर गेल्याने पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात जनसंपर्काची भूमिका सोपवली. मात्र, महासंचालक कार्यालयाने अचानक नवीन फतवा जारी केला. यामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. त्यानुसार, गुन्हे शाखेचा पदभार असलेले सहायक आयुक्त सतीश माने यांना जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.