कौतुकास्पद; राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीची इर्शाळवाडीतील कुटुंबांना मदत

0
328

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांचा पुढाकार

पिंपरी, २८ (पीसीबी) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत वित्त आणि जीवितहानी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीने संवेदनशीलता दाखवत इरशाळवाडीतील कुटुंबीयांना मदत केली. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही मदत केली आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. जीवित आणि वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली.

सामाजिक संवेदनशीलतेचे भान ठेवून आपदेत सापडलेल्या कुटुंबांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाचे कुठेही कार्यक्रम न घेता दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडी वासियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी पुढाकार घेतला. तसेच वरीष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, ज्योती गोफणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष दिपाली देशमुख, मुख्य संघटिका मीरा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

याबाबत कविता आल्हाट म्हणाल्या यंदा ही नैसर्गिक आपदा आल्यामुळे राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर महिला कार्यकारिणीने 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये बुधवार (दि .26) मुंबई येथे जमा केला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर , आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते.