निवृत्त शिक्षिका सरोजिनी तपशाळकर यांचे निधन

0
330

पिंपरी, (दि. 26)- निवृत्त शिक्षिका सरोजिनी व्यंकटेश तपशाळकर (वय 82) यांचे बुधवारी (दि. 26) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ‘एमपीसी न्यूज’चे कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर यांच्या त्या मातुःश्री होत.

सरोजिनी तपशाळकर या पुण्याचे पहिले लोकनिर्वाचित नगराध्यक्ष केशवराव शिरोळे यांच्या कन्या होत्या. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापिका म्हणून तर अलिबाग येथील आरसीएफ इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काही काळ काम केले.

त्यानंतर पिंपरी येथील एच. ए. स्कूलमध्ये प्रदीर्घकाळ अध्यापक म्हणून सेवा केली. वनस्पतीशास्त्र या विषयातील तज्ज्ञ शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जात. अनेक नामवंत विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांनी केले. निवृत्तीनंतर देखील त्यांनी घरगुती शिकवणीच्या माध्यमातून अध्यापनाचे काम चालू ठेवले होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी सव्वादहा सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.

ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. व्ही. एम. तपशाळकर यांच्या त्या पत्नी तर एमपीसी न्यूजचे कार्यकारी संपादक तसेच ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार हृषीकेश तपशाळकर व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपळे सौदागर दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल तपशाळकर यांच्या त्या आई होत.

सरोजिनी तपशाळकर यांच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी पाच वाजता निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.