विम्याचे पैसे आल्याचे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीची 13 लाखांची फसवणूक

0
254

मावळ, दि. २५ (पीसीबी) – विम्याचे पैसे आले असून त्यासाठी अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत एका सेवानिवृत्त व्यक्तीची 13 लाख 16 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 20 मे ते 20 जुलै या कालावधीत वारंगवाडी मावळ येथे घडला.

सुभाषचंद्र कुणतीया आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 66 वर्षीय व्यक्तीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिलिटरी इंजिनिअरिंग सेवेत नोकरी करीत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना 20 मे रोजी आरोपींनी फोन करून त्यांचे विम्याचे 82 लाख 50 हजार 910 रुपये आले असल्याचे सांगितले. हे पैसे मिळविण्यासाठी विमा फी, कर आणि टीडीएस अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यासाठी एकूण 13 लाख 16 हजार 995 रुपये भरले. मात्र त्यांच्या बँक खात्यात कोणतीही विमा रक्कम जमा झाली नाही. तसेच आरोपींनी फिर्यादी यांचे पैसेही परत केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.