लोकसभा निवडणूक – महाराष्ट्र, राजस्थान,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल राज्यात भाजपला किती जागा…

0
523

मुंबई, दि. २४ जुलै (पीसीबी) – सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांच्या तयारीला वेग आलाय. भाजपच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे. तर एनडीएतील पक्षही एकवटले आहे. विरोधकांनी आपल्या एकीला इंडिया नाव दिलेय. अशा राजकीय वातावरणात लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले आहे.

टाईम्स नाऊ आणि ETG यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण केले. ज्यामध्ये 1 लाख 35 हजार लोकांचे मत घेण्यात आले आहे. 22 एप्रिल ते 15 जून दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यनिहाय लोकसभेच्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये धक्कादायक निकाल समोर आलेत.

महाराष्ट्रात कुणाला किती जागा ?

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपला 22 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. (राष्ट्रवादी-शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना UBT) महाविकास आघाडीला 18 ते 22 जागा मिळू शकतात. एक ते दोन जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.

राजस्थानमध्ये कुणाचा दबदबा राहणार –

सर्वेक्षणात राजस्थानबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वेक्षणानुसार, राजस्थानमधील लोकसभेच्या एकूण 25 जागांपैकी भाजपला 20-22 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 3-5 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये भाजपला 51%, कॉंग्रेसला 39% आणि इतरांना 10% मते मिळू शकतात.

मध्य प्रदेशमध्ये कोण मारणार बाजी ?

मध्य प्रदेशातील लोकसभेच्या जागांबाबतही सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, मध्यप्रदेशातील लोकसभेच्या 29 जागांपैकी भाजपला 22-24 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 5-7 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात शून्य जागा जाताना दिसत आहेत. सर्वेक्षणानुसार, भाजपला 53%, कॉंग्रेसला 39% आणि इतरांना 8% मतं मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी-भाजपमध्ये जोरदार टक्कर

सर्वेक्षणात पश्चिम बंगालमधील लोकसभा जागांवरही प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी ममता बॅनर्जीच्या टीएमसीला २०-२२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 18-20 जागा भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. तर सीपीआयएमला १-२ जागा, काँग्रेसला १-२ जागा आणि इतरांना शून्य जागा मिळण्याची शक्यता आहे.