खळबजनक…! एसीपी ने पत्नी, पुतण्याला गोळ्या घालून संपवले, स्वतः केली आत्महत्या

0
3107

पुणे, दि. २४ (पीसीबी) – पुण्यात एक खळबजनक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बाणेर मध्ये ACP ने 44 वर्षीय पत्नी आणि 35 वर्षीय पुतण्याची हत्या करुन स्वतःला संपवले आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या ACP ने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. याबाबत माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

पत्नी मोनी भारत गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ACP भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय पुण्यात बाणेर बालेवाडी परिसरात वास्तव्याला होते.

हत्येनंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिस दलातील अधिकाऱ्यांबाबत अशा घटना हा आता चिंतेचा विषय बनला आहे.