पिंपरी, दि. २० (पीसीबी) – चिंचवड मतदार संघातील नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पक्ष श्रेष्टीकडे शत्रुघ्न काटे यांची अध्यक्षपदी मागणी करूनही डावल्याने चिंचवड मतदार संघातील काही नगरसेवकांचा गट नाराज झाला. दरम्यान, नाराज गटाचे म्हणने ऐकण्यासाठी प्रदेश भाजप कार्यालयातून आज बोलवणे आल्याचे माजी नगरसेवक शत्रृघ्न काटे यांनी पीसीबी प्रतिनिधीला सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख पद नियुक्तीचे वारे वाहू लागले होते. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे नाव आघाडीवर होते आणि पक्षातील काही नगरसेवकांनी तसेच पक्षाच्या पदाधिकारी यांनी श्री शत्रुघ्न काटे यांचे नाव पक्ष श्रेष्ठी यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतरही पक्ष श्रेष्ठी मार्फत डावल्याने चिंचवड मतदार संघातील काही नगरसेवकांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली असून त्यांनी याबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सत्तर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या अखेर बुधवारी (ता.१९) सकाळी जाहीर केल्या. त्यात पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि चिंचवडच्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची नेमणूक करण्यात आली. पण, या नियुक्तीला लगेचच पक्षातूनच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी ३ जानेवारीला दीर्घ आजाराने निधन झाले.त्यानंतर १५ दिवसांतच तेथे पोटनिवडणूक लागली. त्यावेळी उमेदवार म्हणून शंकर जगताप यांचे नाव पुढे येताच त्याला पहिला विरोध पक्षातूनच आणि चिंचवड विधानसभेतील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनीच केला होता. त्यामुळे आ.जगतापांच्या पत्नी अश्विनी यांची उमेदवारी नंतर जाहीर केली गेली.
एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली जात आहेत. यातून भाजपच्या धोरण आणि तत्वांना तिलांजली दिली जाते आहे. शहरातील जुन्या व एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हा निर्णय न पटण्यासारखा आहे. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवून पक्षवाढीसाठी सतत झटणाऱ्यांची त्यामुळे घुसमट होत आहे. सतत होणारा हा अन्याय आता सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळाले. या यशामध्ये स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप , आमदार महेश लांडगे यांच्यासह आमचा हि खारीचा वाटा होता. या पाच वर्षामध्ये पक्षाने नवख्या नगरसेवकांना महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद ,विविध समित्यांचे अध्यक्षपद दिले. त्यांच्या नावाचा पक्षश्रेष्ठींनी विचार न करता एकाच घरात परत दुसरे पद दिल्यामुळे भाजप चा एक गट खूप नाराज असून पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र या पाच वर्षात प्रत्येक वेळी संधी असताना डावलले गेले तरीही शत्रुघ्न काटे हे पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिले. या कालावधीत पक्षातील अनेक नाराज नगरसेवकांनी पक्ष विरोधी भूमिका घेतली. मात्र शत्रुघ्न काटे पक्ष श्रेष्ठींचा आदेश मानला. परंतु यावेळी शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शत्रुघ्न काटे यांचे नाव आघाडीवर असताना देखील याही वेळी डावलण्यात आले.
शत्रुघ्न काटे यांच्या पाठीशी असणारे काही नगरसेवक तसेच काही पदाधिकारी या निर्णयामुळे अत्यंत अस्वस्थ झाले असून येत्या आठवड्याभरात अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांचा गट आणि पदाधिकारी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.