दुर्दैव, बालेकिल्ला असलेल्या शहरात साहेबांच्या राष्ट्रवादीला शहराध्यक्ष शोधूनही मिळेना

0
405

राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आणि अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. पिंपरी चिंचवड शहरात तब्बल २० वर्षे राज्य केल्याने पक्षाचे तमाम माजी नगरसेवक, पदाधिकारी अजिदादांच्या मागे गेले. जे कोणी कुंपणावर आहेत तेसुध्दा दादांकडेच जायच्या मूडमध्ये आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील आख्खी कार्यकारणी दादांचे अभिनंदन करून कामाला लागली. आज परिस्थिती अशी आहे की, राष्ट्रवादीचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या गटाचे नेतृत्व करायला कोणी पुढे यायला तयार नाही. साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तात्पुरती व्यवस्था म्हणून नऊ कार्यकर्त्यांची कार्यकारी समिती जाहीर केली. दुर्दैव असे की, पंधरा दिवस झाले, पण एकही दमदार नाव साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी मिळायला तयार नाही.

शरद पवार यांचे या शहराशी जुने भावबंध आजही कायम आहेत. पूर्वीच्या बारामती लोकसभा मतदारसंघा पिंपरी चिंचवड होते तेव्हापासून पवार या शहराचे नेते. दादांच्या हातात सुत्रे दिल्यापासून त्यांचे दुर्लक्ष झाले. साहेबांच्या समर्थकांना वेचून वेचून दादांनी साईडट्रॅक केले. आझमभाई पानसरे हे त्यातले एक नाव. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, दिवंगत माजी महापौर नाना शितोळे ही तशी साहेबांची माणसे. शितोळे काळाच्या पडद्याआड गेले. पानसरे तब्बेत साथ देत नसल्याने सक्रीय राजकारणातून बाजुला गेले. लांडगे यांनी राजकारण सोडून शैक्षणिक उपक्रमात वाहून घेतले. लांडे यांचा करिष्मा आता राहिलेला नाही. आज राष्ट्रवादीत जी जुनीजाणती नावे आहेत त्यातूनही कोणी साहेबांच्या पालखीचे भोई व्हायला तयार नाहीत. किमान शरद पवार यांच्या विचारांची नाळ जोडलेला कोणी दमदार सर्वव्यापी नेता पाहिजे आहे, पण गल्लीबोळ शोधूनही त्यासाठीचे नाव सापडत नाही ही शोकांतिका आहे. माजी आमदार लांडे यांच्या देव्हाऱ्यात शरद पवार यांचा फोटो आहे इतके ते साहेबांवर प्रेम करतात, पण आज पक्षाची धुरा खांद्यावर घ्यायची तर तेसुध्दा तोंड फिरवून बसलेत.

मुळात अशी वेळ येण्यामागचे कारणही तसेच आहे. ज्या अजितदादांनी साहेबांवर दुगान्या झाडल्या तेच दादा कुटुंब म्हणून काकिंना भेटायला जातात आणि साहेबांची विचारपूस करतात. विधीमंडळाचे अधिवेश सुरू होण्यापूर्वी प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्र्यांनी घेऊन अचानक साहेबांचे आशिर्वाद घ्यायला जातात. तो अद्याय संपतो नाही तोच सोमवारी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन पुन्हा साहेबांना विनविण्या करतात. या घडामोडी पाहिल्यावर कार्यकर्तेसुध्दा संभ्रमात पडलेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दादांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या गटाने निवड केली म्हणजेच एकप्रकारे थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले. दोन गट स्वतंत्र झालेत तर मग साहेबांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील जे पदाधिकारी आपल्यामागे नाहीत त्यांच्या कार्यकारणी बरखास्त केलेल्या नाहीत. उलटपक्षी पिंपरी चिंचवड शहरात नऊ कार्यकर्त्यांची एक कार्यकारी समिती नियुक्त करून जुजबी व्यवस्था केली. समितीत जी नावे घेतलीत तीसुध्दा सर्व अगदी नवख्या कार्यकर्त्यांची आहेत. म्हणजे तिथेही कुठे गांभीर्य दिसत नाही.

मग याचा अर्थ पुन्हा साहेब आणि दादांची राष्ट्रवादी एक होणार की काय, अशीही शंका कार्यकर्ते खासगीत व्यक्त करतात. पवारसाहेबांबरोबर राहिलेले नव्या दमाचे तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवीन समितीत संधी दिली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले. त्यांच्यासह शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, अर्बन सेल अध्यक्ष काशीनाथ जगताप, राष्ट्रवादीशी संलग्न कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते तसेच राजन नायर, शीला भोंडवे, प्रशांत सपकाळ, मयूर जाधव आणि फुटीअगोदर साडेचार महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीत आलेले वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा या समितीत आहेत. आगामी महापालिका निवडणूक किंवा लोकसभा-विधानसभा निवडणुकिला सामोरे जायचे तर यातील कोणाचाही तो घास नाही. त्यामुळे ही कार्यकारी समिती काय काम कऱणार, त्यांच्या मागे कोण जाणार, ते उठबस कुठे कऱणार यापासून सगळाच अंधार आहे. जर साहेबांचीच राष्ट्रवादी खरी आहे, तर खराळवाडीचे कार्यालय या समितीला मिळायला पाहिजे होते, प्रत्यक्षात नवीन कार्यालयासाठी शोधाशोध सुरू आहे.

सगळाच गोंधळ असल्याने कार्यकर्ते आजही जैसे थे च्या मूडमध्ये आहेत. थांबा आणि वाट पाहा, असे आता कार्यकर्तेच बोलू लागलेत. दादा की साहेब या द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादीचे निष्ठावंतांची कोंडी झालीय. हा साहेबांचाच तर खेळ नाही ना, असे कार्यकर्तेच बालू लागलेत. अशा स्थितीत साहेबांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणा होणार याचीच प्रतिक्षा आहे.