मुंबई, दि. १४ जुलै (पीसीबी) – राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. 2 जुलै (रविवार) या दिवशी अजित पवार आणि 8 नेत्यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली. या फुटीनंतर आता शरद पवार अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. पुन्हा पक्षाला उभारी देण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी त्यांनी दौरा, बैठका सुरू केल्या. दरम्यान पुन्हा शरद पवार आपला पक्ष उभा करतील का असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. ‘शरद पवार फक्त महाराष्ट्रात हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल आणि ते निवडणूकीच्या निकालात चांगला आकडा आणतील’ असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. त्याच्या या वक्तव्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पुन्हा पक्षबांधणी करू शकतील का, या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘शरद पवार यांना काही वेगळं करायची गरज नाही. पवार फक्त हात जोडून महाराष्ट्रात फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल आणि निवडणूकीत चांगला निकाल आणतील’. ‘येत्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत चांगला निकाल येईल. एकमेकांच्या मदतीने आमचा चांगला निकाल येईल ही वस्तुस्थिती आहे’, असंही थोरात यावेळी म्हणाले आहेत.
अजित पवारांच्या बंडाची कुणकुण लागली होती, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. ‘काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. अजित पवार हे सभेमध्ये फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे, हे जाणवत होते,’ असंही थोरात यांनी म्हटलंय.