मुंबई, दि. १३ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या आमदारांना बुधवारी (12 जुलै) अखेर शपथविधी होईल अशी आशा होती.मंगळवारी (11 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर आमदारांमध्ये उत्सुकता होती. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले नियोजित दौरे रद्द केल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं. परंतु प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही उलट दिवसभर आपल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली गाठावी लागली.गेली तीन दिवस सलग बैठका घेऊनही शिंदे सरकारचं खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन नेत्यांमध्ये कोणत्या पक्षाकडे कोणती खाती द्यायची याबाबत एकमत होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे. यामुळे तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये आणि इच्छुक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी मात्र या चर्चा फेटाळल्या असून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचं चित्र आज (13 जुलै) संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असं म्हटलं आहे. पण पडद्यामागे नेमकं काय घडतंय? वर्ष उलटलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? आणि आगामी काळात याचे काय पडसाद उमटतील? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी 2 जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. याला आता तब्बल दहा दिवस उलटून गेले पण तरीही या मंत्र्यांचं खाते वाटप झालेलं नाही, तर दुसऱ्या बाजूला मंत्रिपदाचं आश्वासन देऊन वर्ष उलटलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे.