नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – छत्तीसगड कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. १८ जूलैला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. विजय दर्डा यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी दर्डा आणि एका कंपनीसह सहा आरोपींना दोषी ठरवले आहे.
माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह इतरांवरील आरोप निश्चित करताना न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी १८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने IPC च्या कलम 120B 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.
माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, तसेच माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले आहे.











































