व्यावसायिक भागीदाराला मारण्याची 50 लाखांची सुपारी

0
468

सीएसह चौघांना अटक; तीन पिस्टल, 40 जिवंत काडतुसे जप्त

पुणे, दि. १२ जुलै (पीसीबी) – जमीन खरेदी विक्रीच्या व्यावसायिक कारणावरून भागीदाराला मारण्याची 50 लाखांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए), रेकोर्डवरील गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल आणि 40 काडतुसे जप्त केली आहेत.

विवेक नंदकिशोर लाहोटी (वय 42, रा. शाहूनगर, चिंचवड), सुधीर अनिल परदेशी (वय 25, रा. साई धाम सोसायटी, केशवनगर, वडगाव, ता मावळ), शरद साळवी आणि एक महिला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी एका गुन्ह्यात सुधीर परदेशी याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली. त्याबाबत तपास करत असताना परदेशी याच्याकडे असलेल्या शस्त्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली. सुधीर परदेशी आणि त्याचा साथीदार शरद साळवी यांनी मध्य प्रदेश मधून तीन पिस्टल आणि 40 काडतुसे आणली होती. त्यातील एक पिस्टल आणि 24 काडतुसे सीए असलेल्या विवेक लाहोटी याच्याकडे ठेवली होती. आरोपी सुधीर परदेशी हा पोलीस रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचा एका प्रतिष्ठीत सीएशी कसा काय संबंध आला. तसेच त्याने सीएकडे अग्नीशस्त्रे का ठेवली याबाबत पोलिसांना संशय आला.

त्यामुळे पोलिसांनी विवेक लाहोटी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि 24 काडतुसे जप्त केली. लाहोटी याच्याकडे तपास करत असताना त्याने त्याचा व्यावसायिक भागीदार राजू माळी याला मारण्याची सुधीर परदेशी याला 50 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्याचे पुरावे देखील पोलिसांनी लाहोटी याच्याकडून जप्त केले.

सीए असलेल्या विवेक लाहोटी याचा जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. राजु माळी (रा. सोमाटणे फाटा, मावळ) हा त्याचा व्यवसायातील भागीदार आहे. राजू माळीसोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीतून लाहोटी याने त्याच्या जवळच्या मैत्रिणीमार्फत राजू याला मारण्याची सुधीर परदेशी याला 50 लाख रुपयांची सुपारी दिली. त्याच कामासाठी परदेशी आणि साळवी यांनी मध्य प्रदेश मधून पिस्तुल, काडतुसे आणली होती.

राजू माळी हे प्रत्येक शनिवार व रविवारी सातारा जिल्यातील त्याच्या बांधकाम साईटवर भेट देत आणि तिथेच मुक्काम करत असत. त्याच बांधकाम साईटवर माळी यांना मारण्याचा आरोपींचा कट होता. तिथे काही घडल्यास पोलिसांना लवकर सुगावा लागणार नाही, असा विचार करून त्यांनी ते ठिकाण निवडले असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र पोलिसांनी वेळेत हा कट उधळून लावला आहे. दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतिश माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, समिर रासकर, सुमित देवकर, महेश खांडे, सागर शेडगे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे, अमर कदम यांनी केली आहे.