मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राजभवनात मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात तीन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विस्तार होत नसल्याने शिंदे गटात नाराजीची भावना होती, तर खातेवाटप अडून राहिल्याने अजित पवार समर्थकांची अस्वस्थता वाढली होती. अशातच १०५ संख्याबळ असताना कुठेही भाजप आमदारांचा विचार होत नसल्याने निष्ठावंत गटात खदखद आहे. हा समतोल राखण्यासाठी फडणवीस यांची कसरत सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमधली अस्वस्थता उघड झाली. परंतु आठवडा उलटला तरी शिंदे गटातील आमदारांची नाराजी मात्र दूर झालेली दिसत नाही.
17 जुलै रोजी सुरू होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आमचा शपथविधी होईल असा दावा शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार करत आहेत. पण तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर काय भूमिका असेल? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रतोद भरत गोगावले म्हणाले, “आम्ही आमदार चर्चा करून ठरवणार आणि त्यांना तसं कळवणारही त्यांनाही सोपं जाईल. नाहीतर मग जय महाराष्ट्र करू.”
बीबीसी मराठीशी बोलताना भरत गोगावले यांनी थेट “जय महाराष्ट्र” करू हा इशाराच दिल्याने यावरून शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता शिगेला पोहचल्याचं चित्र आहे. याचे नेमके काय परिणाम होतील? आणि मंत्रिमंडळ विस्तार झाला तरीही सत्तेत नवा वाटेकरी आल्याने शिंदे गटाचं राजकीय महत्त्व कमी झालं आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
‘…तर आम्ही जय महाराष्ट्र करू’
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्याला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. परंतु कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार वर्ष उलटलं तरी रखडला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून आपल्याच पक्षातील मुख्यमंत्र्यांना पायउतार करायला लावून शिवसेनेच्या आमदारांनी सत्तेचं नवीन समीकरण आणलं. यावेळी पहिल्या फळीतील आमदारांना काही आश्वासनं देण्यात आली होती.