अजित पवारांच्या बंडामागे शरद पवारच ? सर्वेक्षणातील 37 टक्के लोकांचे मत

0
322

पुणे, दि. ११ (पीसीबी)- महाराष्ट्रात एका मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही नेत्यांसह बंडखोरी करत एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एवढंच नाहीतर अजित पवारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टिकास्त्र डागली आहेतच, पण राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावरही त्यांनी दावा केला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढायचा ठरवलं असून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनाही खडे बोल सुनावले आहेत. बंडखोरांची अधिकृतपणे पक्षातून हाकालपट्टी करत शरद पवारांनी पक्ष मी स्थापन केला असून पक्षाचा अध्यक्ष मीच आहे, असं स्पष्ट केलं आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. सर्व समीकरणंच बदललीच. पण अजुनही अजित पवारांनी केलेल्या बंडाबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. तसेच, अजित पवारांनी उचललेल्या पावलामागे थोरल्या पवारांचाच हात आहे, असाही अद्याप अनेकांचा समज आहे.

अजित पवार यांनी 2 जुलै रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशा राजकीय वातावरणात, महाराष्ट्रातील लोकांचे मत जाणून घेण्यासाठी, सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी एक सर्वेक्षण केलं आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर आला असून जनतेनं अनेक धक्कादायक मतं या सर्वेक्षणातून मांडली आहेत.

राष्ट्रवादीतील फुटीबाबत केलेल्या या जलद सर्वेक्षणात अजित पवारांनी जे केलं त्यामागे शरद पवार आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे अनेक आश्चर्यकारक निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 37 टक्के लोकांनी होय, अजित पवारांच्या या खेळीमागे शरद पवारचं असल्याचं सांगितलं आहे, तर 49 टक्के लोकांचं मत आहे की, तसं अजिबातच नाही. तसेच, 14 टक्के लोकांनी सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना आम्हाला माहिती नाही, असं म्हटलं आहे.