जय श्रीराम बोलायला लावून जमावाने मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना सक्तमजुरी…

0
301

नवी दिल्ली,दि.१०(पीसीबी) – २०१९ मध्ये झारखंडमध्ये घडलेल्या तबरेस अन्सारी लिचिंग केसमध्ये स्थानिक कोर्टानं सर्व दहा आरोपींना दोषी ठरवलं आहे. तसेच या सर्वांना १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोटरसायकल चोरल्याच्या संशयातून अन्सारीला जमावानं बेदम मारहाण केली होती, यात त्याचा मृत्यू झाला होता.

मोटरसायकल चोरल्याच्या आरोपावरुन १७ जून २०१९ रोजी तबरेझ अन्सारीला जमावानं बेदम मारहाण केली होती. इतकंच नव्हे मारहाण होत असताना त्याला जबरदस्तीनं जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणा देण्यास भाग पाडलं गेलं, याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर उपचारांदरम्यान पाच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता. झारखंडच्या स्थानिक कोर्टातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश अमित शेखर यांनी बुधवारी अन्सारीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्व दहा आरोपींना दोषी ठरवलं आहे. दरम्यान, यापूर्वीच दोन आरोपींविरोधात ठोस पुरावे नसल्यानं २७ जून रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सुनावणीत कोर्टानं दहा आरोपींना भादंवि सेक्शन ३०४ अंतर्गत सक्तमुजरीची दहा वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकाला १५,००० रुपयांचा दंड ही ठोठवण्यात आला आहे.

दरम्यान ही घटना घडली तेव्हा झारखंडमध्ये भाजपचं सरकार होतं. त्यामुळं या विषयावर राजकारण होऊन राष्ट्रीय स्तरावर मोठं राजकीय वादळ निर्माण झालं होतं. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत मांडला होता त्यामुळं पाच दिवस सभागृहाचं कामकाज होऊ शकलं नव्हतं.