उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, ३४ जणांचा मृत्यू

0
335

नवी दिल्ली,दि.१०(पीसीबी) – उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, झाडे पडणे आणि वीज पडून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचलमध्ये सर्वाधिक ११ मृत्यू झाले आहेत. याशिवाय यूपीमध्ये ८, उत्तराखंडमध्ये ६, दिल्लीत ३, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या मंडीत बियास नदीच्या प्रवाहात ४० वर्षे जुना पूल वाहून गेला आहे.

दिल्लीत ४१ वर्षांनंतर जुलैमध्ये एका दिवसात १५३ मिमी पाऊस झाला आहे. पावसामुळे उत्तर रेल्वेने १७ गाड्या रद्द केल्या आहेत. १२ गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाने रस्ते ढिगाऱ्यात बदलले आहेत, तर राजधानी दिल्लीसह सपाट राज्यांतील रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दिल्लीतील यमुनेचे पाणी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंजाब, हिमाचलचे मुख्यमंत्री आणि दिल्ली जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरशी बोलले आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

२४ जूनला हिमाचलमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यापासून मोठा विध्वंस झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा मंडी आणि कुलू येथे ढगफुटीमुळे बियास नदीत अचानक पाणी वाढले, त्यात तीन पूल, एक एटीएम आणि चार दुकाने वाहून गेली. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत अतिवृष्टीबाबत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पंजाबमधील अनेक भागात ट्रॅकवर पाणी साचल्याने अंबालाहून उना-अंब-दौलतपूर चौकाकडे येणाऱ्या वंदे भारतसह अन्य गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. श्रीखंड महादेव यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. राजस्थानच्या हनुमानगडमध्ये सहा इंच पाणी पडले आहे. दुसरीकडे, झुंझुनू आणि सीकरमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे.