निलम गोऱ्हे यांना ‘सांभाळून’ राहा असा गर्भित आणि सूचक इशारा

0
295

अहमदनगर, दि. ८ (पीसीबी) : ठाकरे गटाच्या नेत्या, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. गोऱ्हे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटात विशेष करून महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि महिला संघटक स्मिता अष्टेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर घणाघात केला आहे. “नगर जिल्ह्यात आल्यास ‘सांभाळून’ राहा असा गर्भित आणि सूचक इशारा अष्टेकर यांनी दिला आहे. अष्टेकर यांनी व्हिडिओ शेअर करीत गोऱ्हे यांनी इशारा दिला आहे.

” बाळासाहेब ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना मुलगी मानले, उद्धव ठाकरेंनी त्यांना बहीण मानले आणि त्यांना तब्बल चार वेळेस मागच्या दाराने विधान परिषदेमध्ये आमदार केले, पक्षाच्या उपनेत्या केले तसंच विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांना बसवलं. नीलम गोरे यांना शिवसेनेने शून्यातून मोठं केले. मात्र असं असताना सत्तेच्या हव्यासापोटी आपलं पद जाऊ नये म्हणून त्यांनी आता मूळ शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे,” असा आरोप त्यांनी केले.

“तुम्ही आता जेव्हा कधी नगरमध्ये याल तेव्हा सांभाळून राहा, मी किती आक्रमक आहे हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणामध्ये आम्ही महिलांनी छातीचा कोट करून तुम्हाला सुरक्षित ठेवत तिथे प्रचार केला याचा विसर तुम्हाला पडलेला दिसतोय. त्यामुळे नगरमध्ये येताना सांभाळून रहा,” असे अष्टेकर म्हणाले.

“नीलम गोऱ्हे म्हणजे शिवसेनेतील पहिल्या महिला गद्दार आहेत. आमच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांनी तुम्हाला विविध आंदोलनात सक्रिय पाठिंबा दिला आणि त्यामुळे तुम्ही मोठ्या नेत्या झाल्यात. कोठेवाडी प्रकरणात आम्ही तुमच्या सोबत राहिलो आणि नाव तुमचे मोठे झाले. मात्र तुम्ही स्वतःला पद मिळवत असताना आणि स्वतःचं नाव पक्षापुढे मोठे करत असताना आमच्यासारख्या सामान्य महिला कार्यकर्त्यांना काही एक दिलं नाही आणि पक्ष सोडून पक्षाशी गद्दारी केली,” असा आरोप अष्टेकर यांनी केला आहे.