ठाकरे बंधू एकत्र यावेत म्हणून जोरदार हालचाल

0
283

पुणे, दि. ६ (पीसीबी) – अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी ४० आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अशातच ठाकरे बंधु एकत्र यावे, अशी मागणी जोर धरत आहे. मुंबई, ठाण्यात फ्लेक्सही झळकले होते. आता मुंबई, ठाणे पाठोपाठ पुण्यात ही ठाकरे बंधूनी एकत्र यावे असे फलक झळकले आहे.

पुण्यातील स. प. महाविद्यालय चौक, टिळक रोड, कर्वे नगर, शिवणे व इतर ठिकाणी झळकले आहेत. या फलका वरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब व उद्धव साहेब यांच्या छबी बरोबर महाराष्ट्राचा नकाशा आणि हुतात्मा स्मारक लक्ष वेधत आहे. यात तमाम मराठी जनता ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी तीव्र मागणी करत आहे, हीच ती वेळ आहे असा मजकूर लिहला आहे. पुण्यातील महाराष्ट्र सैनिकांनी हा फलक लावला असून संपूर्ण महाराष्ट्रात अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, याबाबत मंगळवारी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे बंधु एकत्र येणार का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मात्र, यावर कुठलीही बैठक झाली नाही, एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे.