पुणे, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत, शिंदे- फडणवीस यांच्या युती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. आता ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
खासदार कोल्हे हे अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र या सोहळ्यानंतर त्यांनी आपल्याला शपथविधीची काही कल्पना नव्हती, वेगळं कार्यक्रम आहे म्हणून इथे बोलवण्यात आलं. मात्र आपण नेहमी शरद पवारांसोबत आहोत, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले होते. अशा आशयाची सोशल मीडियावरही त्यांनी पोस्ट लिहीली होती.
अमोल कोल्हेंनी शरद पवारांना समर्थन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, पहिला मोहरा परतला अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली होती. मात्र आता अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळत आहे. लवकरच ते शरद पवार यांची भेट घेऊन, आपला राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.