उदयसिंह पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी नियुक्ती

0
350

चिखली, दि. १ जुलै (पीसीबी) – कुदळवाडी, चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी मुंबई येथील शिवनेरी सभागृहात झालेल्या बैठकीत नुकतीच नियुक्ती केली. याप्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे , राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्रीरंग बरगे उपस्थित होते .

उदयसिंह पाटील हे प्रामाणिक तळमळीचे अभ्यासू कार्यकर्ते असून मागील २५ वर्षांपासून अधिक काळ निस्वार्थी वृत्तीने शहरातील सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देत आलेले आहेत. महापालिकेतील समाविष्ट झालेल्या गावांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्माण केलेल्या पिंपरी चिंचवड मिळकतधारक संघटनेचे ते संस्थापक – अध्यक्ष असून यापूर्वी देखील युवक मराठा महासंघाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी प्रभावीरीत्या पार पाडलेली आहे . सद्यस्थितीला ते पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून ही सक्रिय आहेत .

अखिल भारतीय मराठा महासंघ ही मागील १२३ वर्षांपासून मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी अविरतपणे कार्यरत असणारी सर्वात शिखर संस्था असून अशा नामांकित व विश्वसनीय संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी श्री. उदयसिंह पाटील यांची निवड झाल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रामाणिक तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्यांस मराठा महासंघामध्ये न्याय मिळाल्याची सार्वत्रिक भावना समाजात निर्माण झालेली आहे .

पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज शहरात स्थायिक झालेला आहे . अशा अल्पभूधारक , आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या , कष्टकरी मराठा समाजाला संघटित करण्याचे आव्हानात्मक कार्य सक्षमतेने पार पाडण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेणार असून त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अशा असंघटित , गरजू मराठा समाजाचा बुलंद आवाज करून , पिंपरी चिंचवड शहरातील प्रभावी दबावगट या नात्याने अखिल भारतीय मराठा महासंघ या पुढील काळात कार्यरत राहील .
मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम आपल्या प्राणांची आहुती देणारे कै. आमदार अण्णासाहेब पाटील, मराठा समाजाच्या हित संवर्धनासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणारे मराठा महासंघाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्या विचारसरणीला अनुसरून त्यांचा वैचारिक पाईक म्हणून मराठा समाजाच्या सर्वांगीण हितासाठी सदैव दक्षतेने कार्यरत राहून महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे – पाटील , राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास यथोचित कामगिरीने सार्थ करून दाखवेन , अशा भावना मराठा महासंघाचे नवनियुक्त शहराध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केल्या.