नदी तीरावर आंघोळ करत असताना आयएएस अधिकारी गेला वाहून…!

0
298

नवी दिल्ली,दि.३०(पीसीबी) – हरियाणा कृषी विभागाचे सहसंचालक जगराज हे देवप्रयागमधील संगम तीरावर आंघोळ करत असताना गंगेत वाहून गेले. जगराज हे कुटुंबासह गंगेत स्नान करण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान त्यांचा पाय अचानक संगम काठावर घसरला, त्यानंतर हा अपघात झाला. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे, मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

जगराज डांडी गुरुवारी आपल्या कुटुंबियांसोबत गंगादर्शनासाठी देवप्रयाग येथे आले होते. गुरुवारी ते ऋषिकेशहून देवप्रयाग येथील गंगा संगम तटावर आले होते, त्यांच्या फॅमिलीसह ते अलकनंदा आणि भागीरथी संगम तटावर स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यावेळी ते नदीतील दगडावर पाय ठेवून उभे असताना पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही. पायाखालील दगड घसरून त्यांचा वाहत्या पाण्यात तोल जाऊन ते पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. त्यांना वाहून जाताना पाहून त्यांची मुलगी आणि पत्नी यांनी जोरजोराने मदतीसाठी धावा केल्या. त्यामुळे आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले, परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

एनडीआरएफची टीम शुक्रवारी शोध मोहीम राबवणार आहे.
आजूबाजूला जमलेले लोक आणि संगमावर आंघोळ करणाऱ्या इतर लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर ठाणे देवप्रयाग पोलीस, जल पोलीस श्रीनगर आणि एसडीआरएफचे संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत जगराजचा शोध लागला नव्हता. देवप्रयाग पोलिस स्टेशन क्षेत्राचे प्रभारी निरीक्षक देवराज शर्मा यांनी सांगितले की, डेहराडूनहून एनडीआरएफची 22 सदस्यीय टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हे पथक शुक्रवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करणार आहे.