पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : पुणे ‘एसीबी युनीट’ची लाचखोरांविरुद्धची कारवाई जोमाने सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यावरील एपीआय अमोल कोरडे, पोलीस शिपाई सागर शेळके यांनी दीड लाख रुपयांची लाच सुदेश नवले या खासगी व्यक्तीमार्फत घेताना १७ जूनला त्यांनी पकडले होते. त्यानंतर आठवड्यातच त्यांनी लाचखोरीच्या पुण्यातील घटनेत महावितरणच्या महिला अभियंता हर्षाली ओम ढवळे (वय ३८) यांना आज अटक केली.
ढवळे या ‘महावितरण’च्या धानोरी शाखा कार्यालयातील सहाय्यक अभियंता (वर्ग २) आहेत. त्यांना १२ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या गुन्ह्यात आज पुणे एसीबीने अटक केली. महावितरण ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याकडूनही त्यांनी वीस हजार रुपये लाच मागितली. नंतर १२ हजारावर तडजोड केली. थ्री फेजच्या एकेका मीटरसाठी त्यांनी प्रथम पाच हजार रुपये मागितले. नंतर तीन हजार घेण्याचे मान्य केले.
यापूर्वी ढवळे यांनी सदर विद्युत ठेकेदाराचे थ्री फेजचे तीन वीजमीटर मंजूर केले होते. तर, चौथा ते मंजूर करणार होते. अशा चार मीटरसाठी त्यांनी ही लाच मागितली होती. मात्र, महिन्याभरानंतरही लाचेचा ट्रॅप यशस्वी झाला नाही.
त्यामुळे लाच मागितल्याचा गुन्हा एसीबीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात ढवळेंविरुद्ध दाखल करून त्यांना आज अटक केली. उद्या पुण्यातील विशेष न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे. एसीबीच्या पीआय प्रणेता सांगोलकर पुढील तपास करीत आहेत.