पंढरपूर, दि. २४ (पीसीबी) – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा ताकद लावून पाहावी, मावळमध्ये मीच जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. श्रीरंग बारणे हे पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावही टीका केली.
समोर कोण याची मला चिंता नाही
मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा मी 2 लाख 53 हजार मतांनी पराभव केला आहे. 2014 असेल 2019 असेल मी समोर कोण आहे हे बघितलं नाही. 2024 च्या निवडणुकीतही मी मावळ मतदारसंघातून विजयी होईल असा विश्वास बारणेंनी व्यक्त केला. समोर कोण आहे याची मला चिंता नाही. मी जनतेतून काम करुन मावळ मतदारसंघात वेगळा ठसा निर्माण केल्याचे बारणे म्हणाले.
जागावाटपाबाबतचा निर्णय झाला आहे
देशभरातील सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे एनडीएचं सरकार येणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. हे सगळे पक्ष एकत्र आले तरी त्यांचा विचार जुळत नसल्याचे बारणे म्हणाले. ते प्रत्येकाचे काम ओढण्याचे काम करत आहेत. 2024 ची निवडणुकीत आणखी बरीच स्थित्यंतरी होतील. पण या देशातील जनता विकासाला महत्व देईल असे बारणे म्हणाले. जागावाटपाबाबत गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात ते निर्णय जाहीर करतील असे श्रीरंग बारणे म्हणाले. सन्मानाने जागावाटप होईल असे बारणे म्हणाले.
संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं
उद्धव ठाकरे हे चांगला माणूस आहेत. पण संजय राऊतांनी त्यांचे राजकारण संपवल्याचे श्रीरंग बारणे म्हणाले. उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचं काम संजय राऊतांनी केल्याचे बारणे म्हणाले. राजकारणाला न शोभणारी वक्तव्य संजय राऊत करत असल्याचे बारणे म्हणाले.
उद्धव ठाकरे हे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या जवळ बसले, यावरुन देखील बारणेंनी टीका केली. हा प्रकार दुर्दैवी आहे. हिंदुत्त्वाचा खरा वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अतिशय प्रभावीपणे राज्यात काम करत असल्याचे बारमणे म्हणाले.