शिवसेनेकडील पिंपरी मतदारसंघासाठी भाजपच्या जोर बैठका

0
293

पिंपरी, दि. २३ जून (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या हक्काचे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसघांबरोबरच आता पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघावरही भाजप दावा करत असल्याने शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपने विधानसभेसाठी शहरातील भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात संभाव्य उमेदवार अनुक्रमे आमदार महेश लांडगे आणि आमदार अश्विनी जगताप यांचे नाव गृहीत धरून तयारीसुध्दा सुरू केली आहे. पिंपरी राखीव च्या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक अमित गोरखे यांना उमेदवारसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याने तिथेही भाजपने जोर बैठका सुरू केल्याने शिवसेना शिंदे गट अक्षरशः संतापला आहे.

तीनपैकी भोसरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अनुक्रमे महेश लांडगे आणि अश्विनी जगताप आहेत. तर, पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. मात्र, येत्या विधानसभेला २०२४ ला पिंपरीत युतीचा आमदार करून शहरात शत-प्रतिशत भाजप करण्याचा निश्चय पक्षाच्या पिंपरीतील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २१) केला. पिंपरीत मोदी @ ९ मोहिमेतील ‘घर चलो अभियानाच्या पत्रकापरिषदेत भाजपने विधानसभेबद्दल आपला मनोदय व्यक्त केला. संभाव्य भाजप उमेदवार म्हणून लोकशाहिर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांच्या पुढाकारातून भाजपने ही मोहिम आखली आहे. आगामी प्रचाराचाच हा भाग असून त्या निमित्ताने पिंपरी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायचा असा भाजपचा प्रयत्न आहे. शिंदे गटाने या जागेसाठी बनसोडे यांच्यासारखे तगडे उमेदवार हेरून ठेवलेत. आजवरच्या तीनही निवडणुकीत भाजपला इथे यश आलेले नाही आणि यापुढे प्रतिकूल वातावरणात ती शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत भाजपने गोरखे यांना चाल दिली तर प्रसंगी तटस्थ राहण्याच्या भूमिकेत शिंदे गट असल्याने भाजपची कोंडी होणार आहे. गोरखे हे मातंग समाजाचे असून या मतदारसंघात नवबौध्द मतदारांचे मोठे वर्चस्व असून समोरचा उमेदवार त्या वर्गाचे प्रतिनिधीत्व कऱणारा असेल तर पुन्हा भाजपला फटका बसेल, असा शिंदे गटाचा युक्तीवाद आहे. यापूर्वी दोनवेळा उमेदवारी दिलेल्या रिपाई आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांचे नाव चर्चेत आहे, मात्र त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने भाजपमध्येही संभ्रम वाढला आहे.

युतीच्या जागावाटपात पिंपरीची जागा शिवसेनेकडे आहे. २०१४ ला तेथून शिवसेनेचे अॅड. गौतम चाबूकस्वार विजयी झाले होते. तर, गतवेळी २०१९ ला त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. मात्र, यावेळी शिंदे शिवसेनेकडे तुल्यबळ इच्छूक उमेदवार नाही. परिणामी ते तगडा उमेदवार आयात करण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांचेच नाव त्याजागेसाठी घेतले जाते.

शिंदे शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड दौऱ्यात राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार बनसोडे यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे पिंपरीतील शिवसेनेच्या जागेबाबत चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. दुसरीकडे भाजपकडे पिंपरीत एकापेक्षा अधिक तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचीही येथे जोरदार तयारी सुरु आहे.
पिंपरीची जागा भाजप लढविणार आहे का, यावर बोलताना भाजपने सावध भूमिका घेतली. याबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना भाजपच्या निरीक्षक वर्षा डहाळे म्हणाल्या, “पिंपरीतील युतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी कटिबद्ध राहू.” तर पिंपरी भाजपचे निवडणूक प्रमुख अमित गोरखे म्हणाले, “पक्ष ठरवेल तो उमेदवार निवडून आणू. दरम्यान पिंपरीतील ६० हजार घरात जाऊन गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार.