“विद्यार्थिदशेपासून देशभक्तीचा संकल्प करा!” – नरेंद्र पेंडसे

0
344

२२ जूननिमित्त संकल्प अभिवादन फेरी संपन्न

पिंपरी, दि. २३ जून (पीसीबी) – “भावी आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी विद्यार्थिदशेपासून देशभक्तीचा संकल्प करा!” असे आवाहन समरसता गतिविधी जिल्हा सहसंयोजक नरेंद्र पेंडसे यांनी क्रांतितीर्थ (क्रांतिवीर चापेकर बंधूंचे मूळ निवासस्थान), चिंचवडगाव येथे गुरुवार, दिनांक २२ जून २०२३ रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्ड याच्या वधाचा २२ जून १८९७ हा दिवस इतिहासात संकल्पदिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने अभिवादन फेरीचे आयोजन केले होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, अशोक पारखी, शाहीर आसराम कसबे, प्रा. दिगंबर ढोकले, अविनाश मोकाशी, राहुल बनगोंडे, गतिराम भोईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् पासून अभिवादन फेरीचा प्रारंभ करण्यात आला.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित थेरगाव येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय आणि खिंवसरा पाटील विद्यामंदिर तसेच चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय व पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् या शाळांमधील विद्यार्थी अभिवादन फेरीत सहभागी झाले होते. पारंपरिक वारकरी वेषभूषा परिधान करून टाळचिपळ्यांच्या साथीने भजन म्हणणारे विद्यार्थी आणि डोक्यावर तुळस घेऊन त्यांना साथ देणाऱ्या नऊवारी साडीतील विद्यार्थिनींचे पथक, त्याच्या मागे विद्यार्थिनींचे लेझीम पथक, मुलांचे ढोलताशा पथक, मर्दानी खेळांचे प्रदर्शन करणारे विद्यार्थी पथक, सजवलेल्या बैलगाडीत क्रांतिकारकांच्या पोशाखातील विद्यार्थी, छत्रपती शिवाजीमहाराजांची पालखी अशा सुमारे एक किलोमीटर लांबीच्या अभिवादन फेरीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर घोषणांना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

चापेकर चौकातील क्रांतिवीरांच्या समूहशिल्पाला माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि सहभागी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सूरज बनसोडे या बालशाहिराने आपल्या विद्यार्थिमित्रांच्या साथीने चापेकर बंधूंच्या पोवाड्याचे दमदार सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

अभिवादन फेरीच्या समारोप प्रसंगी क्रांतितीर्थावर नरेंद्र पेंडसे यांनी क्रांतिकारकांच्या रोमहर्षक कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. अशोक पारखी यांनी प्रास्ताविक केले. गिरीश प्रभुणे यांनी प्रस्तावित भव्य स्मारकाविषयी माहिती दिली. अश्विनी ठाकूर यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर संकल्पाचे उपस्थितांनी सामुदायिक उच्चारण केले.

आरती शिवणीकर, नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, पूनम गुजर, वर्षा जाधव, वासंती तिकोणे, मारुती वाघमारे, अतुल आडे आणि शिक्षक तसेच कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सतीश अवचार यांनी सूत्रसंचालन केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल यांनी आभार मानले