चिखली पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना गोट्या वाटपाचा कार्यक्रम

0
326

चिखली, दि. २२ (पीसीबी) – चिखली येथील पाटीलनगरच्या बगवस्ती परिसरात विस्टेरिया सोसायटी व आजूबाजूच्या इतर सोसायट्यांना मागील बऱ्याच दिवसांपासून अत्यंत अपुरा पाणीपूरवठा होत असून त्याची त्वरीत दखल घेतली नाही तर महापावलिका प्रशासनाचा निषेध म्हणून सामूहिक गोट्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचा इशारा, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, चिखली येथील पाटीलनगर मधील बगवस्ती या ठिकाणच्या विस्टेरिया सोसायटी व आजूबाजूच्या सोसायट्यांना मागील एक वर्षापासून अत्यंत कमी पाणीपुरवठा होत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला असता याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. मागील दहा दिवसापासून तर या भागात अतिशय कमी पाणीपुरवठा होत आहे. सुमारे ५०० सदनिका असलेल्या सोसायटीस फक्त 4 ते 5 हजार लिटर पाणी ते पण दिवसाआड मिळत आहे .या भागात पाणी सोडण्यासाठी ठेवलेल्या ठेकेदारांच्याकडून कोणतेही नियोजन न करता पाणी सोडले जाते.

ज्यांच्याकडून चिरी मिरी भेटली जाते अशाच ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो, असा गंभीर आरोप करून सांगळे म्हणतात, चिखली मधील इतर भागात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो फक्त बगवस्ती मधील काही सोसायट्यांनाच खूप कमी प्रमाणत पाणी सोडले जाते. मागील चार वर्षात या सोसायट्यांनी विकत पाणी घेण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले आहेत.याची सर्व बिल अपणला सादर केली जातील .जर पाण्यासाठी 25 कोटी रुपये लागत असतील तर आयुक्त साहेब आपल्या महानगरपालिकेने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या नावाने अमच्यावरती लादलेला टॅक्स का भरावा हेच कळत नाही? आपली मनपा पाणीपुरवठा करू शकत नसेल तर तुम्ही टॅक्स पण घेऊ नका असा प्रश्न आमचे सदस्य उपस्थित करत आहेत.
या सोसायटीच्या अगदी समोरच आता नवीनच कार्यान्वित झालेला चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.तरीदेखील या भागातील सोसायट्याना रोज 15 टँकर पाणी विकत घ्यावे लागते .हे म्हणजे असे झाले “धरण उशाला आणि कोरड घशाला”, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

पुढील 8 दिवसात जर या भागतील सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही ,तर या भागतील सर्व सोसायटी सदस्यांच्या मार्फत आंदोलन करून सोसायटीच्या शेजारीच असणाऱ्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून जाणारे पाणी घेऊ दिले जाणार नाही. हे पाणी आंदोलन करून बंद केले जाईल. आपल्या निष्क्रिय पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना आपल्या पिंपरी चिंचवड मनपा मधे येऊन सामूहिक गोट्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येईल याची नोंद घेऊन या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती सांगळे यांनी केली आहे.

पुढील 8 दिवसात जर या भागतील पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर या भागात असणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहराला पाणी जाऊ दिले जाणार नाही. आंदोलन करून ते बंद केले जाईल. तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या अकार्यक्षम प्रशासनाच्या विरुद्ध रस्ता रोको करून चिखली- देहूरोड अडवला जाईल तसेच पिंपरी चिंचवड मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्री.श्रीकांत सवने आणि कार्यकारी अभियंता टकले तसेच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना गोट्या वाटपाचा कार्यक्रम घेतला जाईल, असे चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी निवेदनात म्हटले आहे.